पश्चिम महाराष्ट्रातील 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडित...

मागील दहा महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 14 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत.
Power supply to 14 lakh consumers in Western Maharashtra will be cut off
Power supply to 14 lakh consumers in Western Maharashtra will be cut off

पुणे : मागील दहा महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 14 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. या ग्राहकांना पुढील तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. 

लॉकडाऊन काळात वाढीव बील आल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यामुळे भाजप, मनसेसह विविध संघटनांनी या काळातील वाढीव वीजबिल कमी करण्याची मागणी केली होती. पण हे बील योग्यच असल्याचे सांगत महावितरणकडून वीज बिल कमी करण्यास नकार देण्यात आला. तर काही दिवसांपूर्वीच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने दिले होते. त्याची अंमलबजावणी पुढील तीन आठवड्यात सुरू होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात एकूण 1 हजार 962 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. सध्या पुणे जिल्ह्यात 1 हजार 32 कोटी, सातारा जिल्हा 140 कोटी, सोलापूर जिल्हा 259 कोटी, सांगली 192 कोटी तर कोल्हापूर जिल्ह्यात 337 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली. 

गेल्या 1 एप्रिलपासून तब्बल 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरलेले नाही. ही थकबाकी तब्बल 1 हजार 247 कोटी 49 लाख रुपये एवढी आहे. या ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क साधूनही थकबाकीचा भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या ग्राहकांनी पुढील तीन आठवड्यात बिल न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे नाळे यांनी स्पष्ट केले. तसेच थकबाकी न भरणाऱ्या इतर ग्राहकांचा वीजपुरवठाही नियमानुसार खंडित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

महावितरणवर आर्थिक संकट

वीजबिल थकबाकीमुळे महावितरणवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 10 महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक 12 लाख 68 हजार 487 आहे. त्यांच्याकडे 856 कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजपुरवठा खंडित करण्यासाठी पथके तयार केली जाणार आहेत. त्यासाठी आवश्यकतेनुसार इतर कार्यालयातील कर्मचारी व अधिकारीही पथकामध्ये घेतले जाणार असल्याची माहिती नाळे यांनी दिली. 

चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला वीज जोडणी कापण्याची धमकी दिली होती. ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे १०० युनिट वीज तर माफ केलीच नाही. उलट आता जोडण्या कापणे सुरू केले आहे. कुणाच्याही घरी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी वीज जोडणी कापायला आल्यास, त्यांनी आम्हाला कळवावे, असे आवाहन राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com