शरद पवारांसोबत पार्थ यांची दोन तास खलबतं 

गेली दोन दिवसांपासून चर्चेत असलेले पार्थ पवार यांनी गुरुवारी (ता. 13 ऑगस्ट) सायंकाळी आजोबा शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. तब्बल सव्वादोन तास ते त्या ठिकाणी होते. सुमारे पावणे दहाच्या सुमारास ते सिल्व्हर ओकमधून बाहेर पडले. या भेटीबाबत त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
Partha Pawar met Sharad Pawar
Partha Pawar met Sharad Pawar

मुंबई : गेली दोन दिवसांपासून चर्चेत असलेले पार्थ पवार यांनी गुरुवारी (ता. 13 ऑगस्ट) सायंकाळी आजोबा शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. तब्बल सव्वादोन तास ते त्या ठिकाणी होते. सुमारे पावणे दहाच्या सुमारास ते सिल्व्हर ओकमधून बाहेर पडले. या भेटीबाबत त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

दरम्यान, भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी राम मंदिराच्या भूमिपूजनाला दिलेल्या शुभेच्छा, सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआयला देण्याच्या पार्थ यांची मागणी आणि शरद पवार यांचे कालचे वक्तव्य या अनुषंगाने चर्चा झाली असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या धोरणाविरोधात जात पार्थ पवार यांनी जय श्रीराम म्हणत राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच, सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा तपास सीबीआयला देण्याची मागणी केली होती. त्यावरून पत्रकारांनी बुधवारी (ता. 12 ऑगस्ट) शरद पवारांना प्रश्‍न विचारला होता. त्यावर त्यांनी "पार्थ हे अपरिपक्व आहेत. त्यांच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही,' असे विधान केले होते. 

त्यानंतर राज्यभर चर्चेला तोंड फुटले होते. शरद पवारांच्या त्या जाहीररित्या फटकारण्याच्या प्रकारामुळे अजित पवार हे नाराज आहेत, अशीही कुजबूज सुरू झाली होती. त्यानंतर बुधवारी रात्री खुद्द अजित पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज सकाळीही माध्यमांशी न बोलता ते थेट मंत्रालयात गेले होते. त्यामुळे अजित पवार काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. 

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दुपारी मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतरही सुळे अथवा अजित पवार यांनी त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल आणि आजही यावर भाष्य करत पवार कुटुंबात कोणताही वाद नसल्याचे सांगितले आहे. 

दरम्यान, या सर्व घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास पार्थ पवार यांनी "सिल्व्हर ओक' या शरद पवारांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्या ठिकाणी ते सुमारे पावणे दहापर्यंत होते. तब्बल सव्वादोन तास पार्थ हे आजोबाकडे होते. या भेटीनंतरही पार्थ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे भेटीचा तपशील समजू शकला नाही. परंतु पार्थ यांची मागणी आणि त्यावर शरद पवार यांनी केलेले वक्तव्यावर यावर चर्चा झाली असण्याची शक्‍यता आहे. 


Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com