Outstation Labourers Gatherd at Kolhapur
Outstation Labourers Gatherd at Kolhapur

कोल्हापुरात परप्रांतिय कामगारांचा उद्रेक 

कोल्हापूर जिल्ह्याच्या तीनही औद्योगिक वसाहतींमधील परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्याच्या ओढीने शिरोली येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर जमले आहेत.

नागाव : कोल्हापूर जिल्ह्याच्या तीनही औद्योगिक वसाहतींमधील परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्याच्या ओढीने शिरोली येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर जमले आहेत. बिहारला जाणाऱ्या चारशे मजुरांना बुधवारी येथूनच एसटी बसमध्ये बसून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू टर्मिनसवर सोडण्यात आले होते. त्यामुळे आज उत्तर प्रदेशसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने उत्तर प्रदेशमधील शेकडो परप्रांतीय मजुरांनी क्रीडांगणावर गर्दी केली होती. यामध्ये कागल, गोकुळ शिरगाव व शिरोली अशा तीनही औद्योगिक वसाहतींमधील उत्तर प्रदेशच्या मजुरांचा समावेश होता. 

गुरुवारी सकाळी आठपासूनच येथे गर्दी झाली होती. या गर्दीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन या मजुरांना समजविण्याचा प्रयत्न केला व त्यांना आपापल्या राहत्या ठिकाणी परत जाण्याची विनंती केली. पोलिसांच्या या विनंतीला मान देऊन काही परप्रांतीय पुन्हा आपल्या खोलीवर परत गेले. मात्र काही परप्रांतीयांनी आपण घरमालकाचे सगळे भाडे देऊन खोली सोडून बाहेर पडल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्याला आता रस्त्यावर किंवा स्टेशनवर राहिल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा आम्ही चालत उत्तर प्रदेशला जाऊ, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे काही मजूर चालत पुण्याच्या दिशेने गेले, तर काही मजूर चालत कोल्हापूर रेल्वे स्टेशनकडे गेले. त्यांच्यासोबत महिला व मुलेही होते. त्याशिवाय सर्व साहित्य आपल्या डोक्‍यावर घेऊन ते रस्त्याने चालत निघाले होते. 

दरम्यान, पोलिसांनी शिरोली येथे या कामगारांना रोखले असून पोलिस आणि कामगारांमध्ये वादावादी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकमंत्री सतेज वाटील यांनीही या कामगारांची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले आहे. 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व बिहार राज्यातील परप्रांतीय कामगारांना विशेष श्रमिक रेल्वेने त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे. यासाठी संबंधित कामगारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचे रितसर रेकॉर्ड करून अतिशय शिस्तबद्धरित्या या कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे. प्रवासात खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये; म्हणून खाद्यपदार्थांची पाकिटे, पाणी, लहान मुलांसाठी विस्किटे असे भरपूर साहित्य देण्यात आले आहे. त्यामुळे घरी चाललेल्या या कामगारांकडून कोल्हापूरच्या या पाहुणचाराविषयी कौतुक होत असतानाच आज या कामगारांच्या उद्रेकामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी करत असलेल्या प्रयत्नांना तडा गेला आहे. या कामगारांना येत्या दोन-तीन दिवसांत त्यांच्या गावी सोडण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com