बलात्काराच्या घटना थांबविण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी पोलिस ठाण्यांना दिले हे आदेश

पोलिस ठाण्यांना महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना केल्या आहेत.
mumbai police.jpg
mumbai police.jpg

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे निर्भयेवर बलात्कार झाला होता. त्या पीडित महिलेची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. उपचारा दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. राज्यात बलात्काराच्या घटना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महत्त्वाचा आदेश काढला आहे. यात पोलिस ठाण्यांना महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना केल्या आहेत.

आदेशात म्हटले आहे की, नुकतीच साकीनाका पोलिस ठाणे हददीत रात्रीच्या वेळी एकटया महिलेवर अत्याचाराची घटना घडलेली आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरीता पुढील उपायोजना करण्यात याव्यात.

हेही वाचा...

साकीनाका येथील घटनेच्या वेळी पोलिसांचा प्रतिसाद 10 मिनिटांचा होता. अशा घटनामध्ये नियंत्रण कक्षाची भुमिका अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही कॉल विशेष करून महिलांसंदर्भात कॉलकडे दुर्लक्ष करू नये. त्याची तात्काळ योग्य ती निर्गती करावी. नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी यांनी यावर सतत लक्ष ठेवावे.

पोलिस ठाणे हद्दीतील अंधाराची ठिकाणे, निर्जन ठिकाणांचा आढावा घेवून त्या ठिकाणी बीट मार्शल, पेट्रोलींग मोबाईल वाहने यांची जास्तीत जास्त गस्त ठेवावी. अंधाराच्या व निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्याकरीता महानगर पालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा तसेच अशा ठिकाणी सी.सी.टी.व्ही बसविण्याकरीता संबंधीताकडे प्रस्ताव सादर करून याबाबत पाठपुरावा करावा.

निर्जन स्थळी, अंधाराच्या ठिकाणी क्यूआर कोड लावावेत. जेणेकरून गस्तीवरील वाहने, गस्त करणारे पोलिस अधिकारी अथवा अंमलदार यांचा वावर होवुन अनुचित प्रकार टाळता येईल व त्यास प्रतिबंध करता येईल. पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी सार्वजनिक महिला प्रसाधनगृहे आहेत, त्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पुरेशी लाईट व्यवस्था करून घ्यावी. तसेच त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक 5 गस्त ठेवावी.

गस्ती दरम्यान पोलिस अधिकारी अथवा अंमलदार संशयित इसमांना ताब्यात घेवून त्यांची तपासणी करून त्यांच्याकडे त्या ठिकाणी येण्याच्या प्रयोजनाबाबत चौकशी करावी व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. रात्री गस्ती दरम्यान एखादी महिला एकटी आढळून आल्यास महिला पोलिस अधिकारी अथवा अंमलदारांमार्फत विचारपूस करून त्यांना तात्काळ योग्य ती मदत देण्यात यावी. 

हेही वाचा...

गरज भासल्यास सदर महिलेस सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. पोलिस ठाणे हददीतील अंमली पदार्थांची नशा करणारे व अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांवर योग्यती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.

पोलिस ठाणे हददीत रस्त्यावर बेवारसरित्या बऱ्याच काळापासुन उभ्या असलेल्या टेम्पो, टॅक्सी, गाडयांच्या मालकांचा शोध घेवुन वाहने त्यांना तेथुन काढण्यास सांगणे अन्यथा अशी बेवारस वाहने ताब्यात घेवुन पुढील कारवाई करावी.

महिलांसंबंधीत गुन्हयात कलम ३५४, ३६३, ३७६, ५०९ व पोस्को कायद्याअंतर्गत अटक आरोपींचा स्वतंत्र अभिलेख तयार करण्यात यावा (Sexual offender list) व अशा सर्व आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी.

ज्या पोलिस ठाणेच्या हद्दीत रेल्वे स्थानके आहेत व बाहेरून येणाऱ्या लांब पल्याच्या गाड्या थांबतात अशा सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलीस बंदोबस्ताकरीता एक मोबाईल वाहन रात्री 10 वाजता ते सकाळी 7 वाजेपर्यंत तैनात करण्यात यावी. 

मोबाईल वरील कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांनी एकटया येणाऱ्या महिलांची विचारपूस करावी. तसेच त्यांना योग्य ती मदत करून त्यांना इच्छित स्थळी पोहचण्याकरीता वाहनांची गरज असल्यास वाहन उपलब्ध करून त्या वाहनांचा क्रमांक, वाहनावरील चालकाचा मोबाईल क्रमांक नोंद करून घेतील. संबंधीतांनी नमूद एकट्या महिलेस विहित स्थळी सुरक्षित पोहचविले आहे किंवा कसे, याबाबत खात्री करावी.

ज्या पोलिस ठाणे हद्दीत रेल्वे स्थानके आहेत अशा पोलिस ठाण्यातील रात्री गस्तीवरील अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानका बाहेर भेटी दयाव्यात व तेथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.

या सूचनांची सर्व संबंधीतांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यात कोणीही दुर्लक्ष करणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com