सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?...फडणवीसांचा हल्लाबोल

लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्यासह सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे.
Opposition leader Devendra Fadanvis slams state government over enquiry of celebrity tweets
Opposition leader Devendra Fadanvis slams state government over enquiry of celebrity tweets

मुंबई : लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्यासह सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, चौकशीची मागणी करणारे आणि ती मान्य करणाऱ्यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे," असा शब्दांत फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. 

शेतकरी आंदोलनावरून सुरू झालेल्या ट्विटर वॉरची गुप्तहेर विभागामार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून आता वाद निर्माण झाला असून भाजपकडून सरकारवर टीका करण्यात आली आहे. भाजप नेत्या विजया रहाटकर, राम कदम यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटकरून या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

''संतापजनक, कुठे गेला मराठीबाणा, कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे,'' असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी ट्विट करून सरकारवर टीका केली. ''ठाकरे-पवार सरकारला वेड लागलं आहे का? तारतम्य राहिलं आहे की नाही?'' असे ट्विटमध्ये म्हटले आहे. '' मंगेशकर, सचिन तेंडूलकर, अक्षय कुमार सुनिल शेट्टी यांनी देशाच्या एकतेबद्ल ट्विट केले आहे. काँग्रेस पक्ष आपल्या देशाला बदनाम करणाऱ्यांचा प्रवक्ता बनला आहे. पण या निर्णयामुळे काँग्रेसला देशापेक्षा आपल्या पक्षावर जास्त प्रेम आहे. देशहितासाठी ट्विट करणे गुन्हा आहे का? लतादीदी आणि सचिनची माफी मागून हा निर्णय मागे घ्यावा,'' असे राम कदम यांनी म्हटले आहे. 

मोदी सरकार टाकतेय दबाव - काँग्रेसचा आरोप

कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं आहे.  याला उत्तर म्हणून सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेकांनी ट्विट केले. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत विरोधी प्रपोगंडा राबविली जात असल्याचा दावा केला होता. त्यावेळी '#IndiaTogether' '#IndiaAgainstPropoganda' असे हॅशटॅग वापरण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच देशातील सेलिब्रिटींनी हे हॅशटॅक वापरून रिहाना व ग्रेटला विरोध करणारे ट्विट केले. 

काँग्रेसने याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना संबंधित ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्व सेलिब्रिटींचे ट्विट एकसारखेच असल्याने केंद्र सरकारनेच त्यांच्यावर दबाव आणला होता, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळे या ट्विटच्या अनुषंगाने भाजप नेत्यांची चौकशी करावी, असे सावंत यांनी म्हटले आहे. या सेलिब्रिटींवर केंद्र सरकारकडून दबाव टाकला जात आहे. हे भाजपनेच केल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे या सेलिब्रिटींना संरक्षण देण्याची गरज असल्याची मागणी सावंत यांनी केली. 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले....

शेतकरी आंदोलनावर देशातील सेलिब्रिटींनी एकाच वेळा ट्विट करण्यासाठी दबाव टाकला आहे का, याची चौकशी केली जाईल. या सेलिब्रिटींच्या ट्विट एकाच वेळी कशा आल्या, सायना नेहवाल व अक्षय कुमार यांची ट्विट एकासारखीच दिसतात. त्यामुळे हे ठरवून घडवण्यात आले का? याची चौकशी केली जाईल, असे देशमुख म्हणाले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com