only one corona positive patient found in dharavi on tuesday | Sarkarnama

धारावीत आशादायी चित्र; आज कोरोनाचा केवळ एकच नवा रुग्ण

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जुलै 2020

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, मुंबईत रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत आहे. या परिस्थितीत धारावीतील परिस्थिती मात्र, आशादायी दिसू लागली आहे. 

मुंबई : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषत: मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन चिंतित आहे. या परिस्थितीत प्रशासनाला धारावीतून आशादायी चित्र आज दिसून आले आहे. धारावीत मंगळवारी कोरोनाच्या केवळ एक नवीन रुग्ण आढळला आहे. धारावीत आतापर्यंत एकूण  2 हजार 335 रुग्ण आढळले आहेत. 

धारावीत मंगळवारी कोरोनाचा फक्त एक नवीन रुग्ण आढळला आहे. याचबरोबर आज एकाही कोरोनामृत्यूची नोंद झाली नाही. धारावीतील रुग्णांची एकूण संख्या आता 2 हजार 335 झाली असून, मृतांचा आकडा 81 वर स्थिर आहे. दादरमध्ये 20 नवीन रुग्ण सापडल्याने एकूण संख्या 1 हजार 4 वर गेली आहेत. दादरमध्ये आतापर्यंत 16 रुग्ण दगावले आहेत. माहीममध्ये 11 नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण संख्या 1 हजार 275 झाली असून, मृतांचा आकडा 14 आहे. धारावी-दादर-माहीम या तीनही परिसरांत दिवसभरात 32 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 4 हजार 614 वर गेली आहे. आतापर्यंत 111 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. आतापर्यंत दादरमधील 622, माहीममधील 850 आणि धारावीतील 1 हजार 735 असे एकूण 3207 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

राज्यात कोरोनाचा  कहर वाढला असून, मंगळवारी 5 हजार 134 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 17 हजार 121 झाली आहे. राज्यात आणखी 224 मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 9 हजार 250 वर पोहोचला आहे. राज्यात एकूण 88 हजार 294 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात मंगळवारी 3296 कोरोनामुक्त रुग्णांना घरी पाठवण्यात आले. आतापार्यंत 1,18,558 जणांनी कोरोनावर मात केली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.6 टक्के झाले आहे. 

राज्यात मंगळवारी कोरोनाने आणखी 224 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईत 64, ठाणे जिल्ह्यात 73, पुणे मंडळात 48, औरंगाबाद मंडळात 7, नाशिक मंडळात 24, लातूर मंडळात 5, अकोला मंडळात 2 व इतर राज्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर 4.26 टक्के झाला आहे. आतापर्यंत 11 लाख 61 हजार 311 कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी 2 लाख 17 हजार 121 म्हणजे 18.69 टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 31 हजार 995 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आणि 45 हजार 463 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख