'नो मराठी, नो अॅमेझॉन'प्रकरणी राज ठाकरेंना नोटीस - Notice to MNS Chief Raj Thackeray over Amazon issue | Politics Marathi News - Sarkarnama

'नो मराठी, नो अॅमेझॉन'प्रकरणी राज ठाकरेंना नोटीस

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉन यांच्यातील मराठीविषयीचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. अॅमेझॉनचे फलक फाडल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली असून ५ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉन यांच्यातील मराठीविषयीचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. अॅमेझॉनचे फलक फाडल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली असून ५ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

विशेष म्हणजे, मनसेनेही आता आक्रमक पवित्रा घेतला असून महाराष्ट्रात व्यापारी राजवट नाही, तर मराठी माणसाचीच राजवट असेल, असे अधिकृत ट्विट केले आहे. अॅमेझॉन अॅपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नसल्याने काही दिवसांपूर्वी मनसेने समाजमाध्यमावर 'नो मराठी, नो अॅमेझॉन' ही हॅशटॅग मोहीम सुरू केली. अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करावा आणि अॅमेझॉनने त्याबाबत दिलगिरी व्यक्त करावी, अशी नोटीस ऑक्‍टोबर महिन्यात मनसेच्या वतीने कंपनीला देण्यात आली होती. 

सध्या अॅमेझॉनच्या अॅपमध्ये हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे अॅपमध्ये मराठी भाषा नसल्याने मनसेने हे आंदोलन सुरू केले आहे. दिंडोशीमधील एका बसथांब्यावर लावण्यात आलेले अॅमेझॉनचे फलक मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडले होते. त्याविरोधात अॅमेझॉनच्या वतीने न्यायालयात फौजदारी तक्रार करण्यात आली असून न्यायालयाने येत्या 5 जानेवारीला ठाकरे यांनी न्यायालयात हजेरी लावावी, असे आदेश दिले आहेत.
मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचे अॅमेझॉनकडून सांगण्यात येत होते. मात्र, त्यांनी मनसेविरोधात दावेदेखील दाखल केले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख