मुंबई : उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेमध्ये काही तथ्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीमध्ये एकत्रित विचाराने निर्णय होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यास रिक्त होणारे विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे सोपवण्याची तयारी काँग्रेसने दाखविल्याचे समजते. त्याबदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्री व इतर काही महत्वाची खाती हवी आहेत. नव्या प्रस्तावानुसार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नवे उपमुख्यमंत्री होऊ शकतील. विधानसभा अध्यक्षांसारखे महत्त्वाचे पद मिळणार असल्याने शिवसेना या प्रस्तावाला अनुकूल असल्याचे समजते.
अजित पवार यांना या प्रस्तावाबाबत विचारले असता ते म्हणाले की, ''अशा बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. एक वर्षांपूर्वी आघाडी अस्तित्वात आली आहे. त्यावेळी आम्ही घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करत आहोत. सर्व निर्णय संगनमताने होत आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. घरातल्या प्रश्नात बाकीच्यांनी बोलण्याचे कारण नाही,'' असेही पवार यांनी स्पष्ट केले.
काय आहे चर्चा?
नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यास विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे सोपवण्याची तयारी काँग्रेसने दाखविल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम मानली जाणारी काँग्रेसची शक्ती प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे समजते.
कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही आमदारांच्या पळवा पळवीचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केल्यास पक्षांतरबंदीचे सर्व कायदे राबवणारे अध्यक्षपद शिवसेनेकडे स्वत:हून सोपवणे योग्य नसल्याचे काँग्रेसमधील काही ज्येष्ठांचे मत आहे.
शिवसेनेने मात्र या प्रस्तावावर चर्चा करायला हरकत नाही, अशी सावध भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने अध्यक्षपद आमच्याकडे येत असेल, तर ते चांगलेच नाही का, अशी टिपणी जोडत याबद्दल तशी वेळ आल्यास महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीत चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले.
तीन नावांची चर्चा
नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्तीशी संबंधित काही मुद्द्यांमध्ये अध्यक्षपद हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने मान्य केले. विद्यमान अध्यक्षांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण, के. सी. पडवी, यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे.
अध्यक्षपद सोडायचे नाही, असे ठरल्यास अशोक चव्हाण किंवा नितीन राऊत यांच्याशी पटोलेंच्या जबाबदारीची आदलाबदल होऊ शकते. पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळेन पण, मंत्रिपद हवे असल्याची अट घातल्याचेही बोलले जाते. त्यामुळे हा पदबदलाचा प्रस्ताव चर्चेत आला आहे.
Edited By Rajanand More

