मुंबई : महाविकास आघाडीवर आणि त्यातही शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी आमदार नितेश राणे सोडत नाहीत. आता चर्चेत असलेल्या पुजा चव्हाण प्रकरणात आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नांव घेतले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. महाविकास आघाडीला दूरदृष्टी आहे, म्हणूनच त्यांनी 'जेल पर्यटन' सुरु केले असावे, असा सणसणीत चिमटा राणे यांनी काढला आहे.
पुण्यात टीक टाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर महाआघाडी सरकारमधील एक राज्यमंत्राचे नाव या प्रकरणामध्ये पुढे येत आहे. त्यावरुन विरोधक महाविकास आघाडीला लक्ष्य करीत आहेत. या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्याचे नांव घेतले जात आहे. त्यामुळे राणे यांना शिवसेनेवर टीका करण्याची संधीच मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी दिशा सालियान हिच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडीतील एका युवा नेत्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. त्यावरुनही राणे यांनी आघाडीवर निशाणा साधला आहे.
काही दिवसांपूर्वी समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. हे प्रकरण मिटते न मिटते, तोच या महिलेच्या बहिणीने मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला. त्यावरुन राणे यांनी टीका केली आहे. आघाडीतल्या काही मंत्र्यांचे 'कहानी घर घर की' सुरु असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये ते म्हणतात...
...या महाविकास आघाडी सरकारची दूरदृष्टीला सलाम!
यांना माहीत होते..
पर्यावरणमंत्र्या ची 'दिशा"चुकली..
मग आता वनमंत्री 'पूजा' घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत..
बाकी मंत्र्यांचे पण 'कहानी घर घर की' चालू आहे..
म्हणूनच 'जेल पर्यटन' चालू केले असावे!
जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ?
Edited By - Amit Golwalkar

