दाऊदला कोरोना...आणि त्यात मृत्युही? काय आहे नक्की तथ्य? - News on Social Media About Dawood Ibrahim's Death Not True | Politics Marathi News - Sarkarnama

दाऊदला कोरोना...आणि त्यात मृत्युही? काय आहे नक्की तथ्य?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 जून 2020

दाऊद इब्राहिम व त्याची पत्नी मेहजबीन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी कराचीच्या लष्करी रुग्णालयात दाखल केले असून दाऊदच्या सुरक्षा रक्षकांना क्वारंटाईन केल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडियावर चर्चेत आहेत.  शनिवारी तर  दाऊदचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्यामाही जोरात पसरवल्या गेल्या

अंधेरी  : सध्या कुख्यात गुंड व मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या सोशल मिडियावर चर्चेत आहेत. मात्र यात तथ्य नसून सद्यस्थितीवरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी दाऊदच्या मृत्यूची बातमी मुद्दामहून पसरवली जात असल्याचे मत आजी-माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

दाऊद इब्राहिम व त्याची पत्नी मेहजबीन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी कराचीच्या लष्करी रुग्णालयात दाखल केले असून दाऊदच्या सुरक्षा रक्षकांना क्वारंटाईन केल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडियावर चर्चेत आहेत.  शनिवारी तर  दाऊदचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्यामाही जोरात पसरवल्या गेल्या. पाकिस्तानच्या कुठल्याही वृत्तपत्राने किंवा वृत्तवाहिनीने मात्र या संदर्भात वाच्यता केलेली नाही, किंवा अधिकृत पातळीवर या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही. 

मग सत्य काय?

यापूर्वीही वेळोवेळी दाऊद संदर्भात अनेक वेगवेगळ्या बातम्या आल्या होत्या. लोकांच्या मनात कोरोनाची भीती वाढल्याने कोरोनावरून त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठीच अशा अफवा पेरण्यात येत असल्याचा काहींचा दावा आहे. यामागे काही राजकारणी असण्याचीही शक्‍यता असल्याचे मत अंडरवर्ल्ड जवळून बघितलेल्या एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या व्यक्त केले.

कोरोना असू शकतो पण मृत्यू?

कोरोनामुळे दाऊदचा मृत्यू झाला, हे वृत्त साफ खोटे असल्याचे दहशतवाद विरोधी पथकातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे. कदाचित दाऊद आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी खरीही असू शकते. मात्र मृत्यूची बातमी शंभर टक्के खोटी आहे, असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले. 

दरम्यान, दाऊद संदर्भातील बातम्या समाज माध्यमांवर, वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होत असताना, पाकिस्तानच्या एकाही वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीने या बातम्यांची दखल घेतली नाही किंवा या वृत्ताबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्वीटरसारख्या माध्यमावर मात्र दाऊदच्या मृत्युची बातमी ट्रेंड होते आहे. दाऊद पाकिस्तानमध्ये आहे, हे जगाला ठाऊक असले तरी पाकिस्तान दाऊदला कधीही भारताच्या हवाली करणार नाही, हे राजकारण्यांना चांगलेच माहिती आहे. त्याच्या मृत्यूसंदर्भातील अफवा कायम उठत असतात. अनेक लोकांसाठी ते सोयीचेही आहे असे मत निवृत्त आयपीएस अधिकारी पी. के. जैन यांनी व्यक्त केले आहे. 

अनिस इब्राहिमकडून इन्कार

दरम्यान, दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. अनिस हा दाऊदच्या टोळीच्या आर्थिक व्यवहार आणि इतर कामकाज पाहतो. अनिसने एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, भाई (दाऊद) हे सुखरुप आहेत आणि शकीलही सुखरुप आहे. आमच्या कुटुंबातील एकाही सदस्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. सर्व जण घरी सुरक्षित आहेत. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आमचे कामकाज सुरळीत सुरू आहे, असे अनिस इब्राहिमने म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख