मुंबई : कोरोना विषाणूचा नवा प्रकार ७० टक्के अधिक वेगाने संक्रमित होऊ शकतो. तसेच नवा प्रकार ३० ते ६० वयोगटातील लोकांसाठी अधिक धोकादायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सच्या सदस्यांनी केले आहे.
केंट आणि लंडनमध्ये आढळलेल्या काही प्रकरणांनंतर इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारावर काम केले आहे. तसेच कोरोना विषाणूच्या जगभरात आढळलेल्या हजारो छोट्या बदलांची संशोधकांनी नोंद केली आहे. त्यानुसार कोरोना विषाणूतही अनुवांशिक बदल होत आहेत. भारतीयांसाठी हा नवा प्रकार कितपत धोकादायक आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे याला गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे मत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुत पंडित यांनी सांगितले.
सामान्यत: विषाणूंमध्ये दरवर्षी बदल होत असतो. त्यामुळे कोरोना विषाणूतही बदल होणे हे असामान्य नाही, असे संशोधकांचे म्हण्णे आहे. स्पेनमध्येदेखील कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. संशोधकांच्या मते स्पेनमधील विषाणूमध्ये १७ बदल होते. त्यामुळे तो पूर्वीपेक्षा लोकांमध्ये अधिक सहजतेने पसरत आहे. दक्षिण इंग्लंडच्या भागातदेखील हा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे; मात्र संसर्गाचा किती लवकर गुणाकार होतो हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने यूकेव्यतिरिक्त डेन्मार्क, बेल्जियम, नेदरलॅंड्स आणि ऑस्ट्रेलियामध्येही हा प्रकार आढळल्याचे सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेतही असाच वेगळा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे आता कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराला रोखणे सर्व देशांसमोर प्रमुख आव्हान असणार आहे.
त्रिसूत्री पाळणे गरजेचे!
नियमित हात धुणे, फेस मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखणे, ही त्रिसूत्री पाळणे कायम गरजेचे असल्याचे कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग मर्यादित ठेवण्यासाठी शासनाने शिफारस केलेल्या नियमांचे आणि मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करणे आवश्यक आहे, असेही डॉ. पंडित यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

