पार्थ पवारांचा नाही महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास...गृहमंत्र्यांकडे केली सीबीआय चौकशीची मागणी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. बॉलीवूडमधील अनेक गैरप्रकार समोर येत असून, या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
ncp leader parth pawar demands cbi investigation in sushant singh rajput case
ncp leader parth pawar demands cbi investigation in sushant singh rajput case

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या धक्क्यातून बॉलीवूड अद्याप सावरलेले नाही. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये वादळ उठले आहे. सुशांतच्या आत्महत्येची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या पुत्राकडूनच महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास दाखविण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

सुशांतच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्याचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा तपासणी अहवाल पोलिसांना मिळाला आहे. या अहवालात सुशांतच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता पोलिसांना सुशांतच्या आतड्यातील काही भाग आणि नखांच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल मिळणे बाकी आहे. 

सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. पार्थ पवार यांनी याबाबत देशमुख यांना निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी योग्य पद्धतीने तपास करण्याची गरज आहे. राष्ट्रीय पातळीवरही हा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी भावना आहे. याचा विचार करुन या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा. सुशांतला न्याय मिळावा, अशी देशातील तरुणांची मागणी आहे. 

सुशांतच्या आत्महत्येनंतर देशातील अनेक तरुण दु:खात आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांतून मला तरुणांचे ई-मेल आणि मेसेजेस येत आहेत. ते मला यात लक्ष घालण्याची विनंती करीत आहेत. यामुळे देशातील कोट्यवधी तरुणांची भावना तुमच्यापर्यंत पोचवून या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहे, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे. 

सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआयमार्फत करावा, अशी मागणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची शक्यता फेटाळून लावली होती. आता उपमुख्यमंत्र्यांच्या पुत्रानेच सीबीआय चौकशीची मागणी केल्याने देशमुख कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणी यशराज फिल्म्सचे (वायआरएफ) आदित्य चोप्रा यांची पोलिसांनी नुकतीच चौकशी केली होती. वांद्रे पोलीस ठाण्यात बोलावून ही चौकशी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३८ जणांचे जबाब नोंदविले आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा मॅरेथॉन तपास सुरू आहे. आगामी काळात आणखी काही जणांचे जबाब नोंदविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. यामुळे याआधी यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. शानू यांनी अभिनेता रणवीरसिंह, अर्जुन कपूर, वाणी कपूर यांना चित्रपटसृष्टीत पदार्पणाची संधी दिली होती. सुशांत याच्यासोबत त्यांनी यश राज फिल्म्सच्या शुद्ध देसी रोमान्स आणि डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटांसाठी काम केले होते. 

सुशांतवर उपचार करणारे मानसोपचारतज्ञ डॉ.केर्सी चावडा यांचाही जबाब पोलिसांनी नोंदविला होता. सुशांतवरील वैद्यकीय उपचाराबाबत माहिती घेण्यासाठी ही चौकशी करण्यात आली होती. त्याची मानसिक स्थिती आणि औषधोपचार याचीही माहिती घेण्यात आली होती.

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, वायआरएफने सुशांतसोबत केलेल्या कराराच्या प्रती पोलिसांना दिलेल्या आहेत. सुशांतसोबत झालेल्या या करारातील अटी आणि शर्तींची तपासणी पोलीस करीत आहेत. या करारांची अंमबजावणी योग्य व्यावसायिक पद्धतीने झाली की नाही, याचाही तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.  पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com