नाना पटोलेंनी चव्हाण, शिंदेंकडून सिस्टिम समजून घ्यावी : नवाब मलिकांचा टोला - Nana Patole should understand the system from Chavan, Shinde : Nawab Malik | Politics Marathi News - Sarkarnama

नाना पटोलेंनी चव्हाण, शिंदेंकडून सिस्टिम समजून घ्यावी : नवाब मलिकांचा टोला

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

आज जी परिस्थिती आहे, ती कायम तशीच असते.

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अपूर्ण माहितीच्या आधारे सरकारवर आरोप करत आहेत. सरकार कोणाचेही असो राजकीय कार्यक्रम, आंदोलने, बैठका किंवा राजकीय नेते, मंत्री यांचे दौरे याबाबतची नोंद गृह विभागाच्या विशेष शाखेकडून घेतली जाते. ती महिती संकलित करून अहवाल पुरवला जातो. सर्व पक्षाच्या कार्यक्रमांची माहिती गोळा करण्याचे काम गृहखात्याचे असते. पण, नाना पटोले यांनी अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप केले असावेत. नाना पटोले यांना ही सिस्टिम जर माहिती नसेल तर त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून त्याबाबतची माहिती जाणून घेतली पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी नाना पटोले यांच्या आरोपांना उत्तर दिले.  (Nana Patole should understand the system from Chavan, Shinde : Nawab Malik)

लोणावळा येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याच सरकारवर गंभीर आरोप केले होते. माझ्यावर सरकारकडून पाळत ठेवली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाची नोंद ठेवली जात आहे. माझ्या हालचालींची माहिती गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे पुरवली जात आहे, असे त्यांनी आरोपांमध्ये म्हटले होते. त्यावर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले.

हेही वाचा : मी एका पराभवाने खचणारा शिवसैनिक नाही

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते मलिक म्हणाले की, नाना पटोले यांनी अपूर्ण माहितीच्या आधारे हे आरोप केले असावेत. आज जी परिस्थिती आहे, ती कायम तशीच असते. कारण, राज्यातील सर्व राजकीय नेते, पक्ष यांचे कार्यक्रमाची नोंद पोलिसांच्या विशेष शाखेकडून ठेवली जाते. ही सिस्टिम नाना पटोले यांना माहिती नसेल तर त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून समजून घेतली पाहिजे. नाना पटोले यांना जर वाटत असेल की त्यांच्या कार्यक्रमांना नेत्यांना, मंत्र्यांना पोलिस बंदोबस्त नको, तर त्यांनी तसा अर्ज केला केल्यास गृह विभाग तसा निर्णय घेऊ शकते, असा टोलाही त्यांनी लगावला. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नव्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी आल्यानंतर भाजपतील काही लोकांकडून धमक्या दिल्या जात आहे. सहकार संस्था असलेल्या लोकांची खैर नाही, असे सांगितले जाते. पण, सहकार हा राज्याच्या अखत्यारित येणारा विषय आहे. मल्टीस्टेट विषय असेल तरच केंद्र सरकारला त्यात हस्तक्षेप करता येईल. नवे सहकार मंत्रालय यासंबंधी काय नवे कायदा करते, तोपर्यंत नव्याने काही होणार नाही. एखाद्या नेत्याच्या नावाने धमकी देणे योग्य नाही. हे भाजप नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख