नाना पटोलेंचे अखेर ठरले! होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष - Nana Patole Name Final for Congress State President Chief's Post | Politics Marathi News - Sarkarnama

नाना पटोलेंचे अखेर ठरले! होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होणार असल्याचे जवळपास नक्की झाले असून ते लवकरच विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे

मुंबई : विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होणार असल्याचे जवळपास नक्की झाले असून ते लवकरच विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काही फेरबदल होतील, अशीही शक्यता आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी राज्यातील नेत्यांसोबत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत चर्चा केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी अनुकूल असले तरी राज्यातील नेत्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव लावून धरले आहेत. पटोले यांचे नाव निश्चित झाल्याचे मानले जात असले तरी ते मंत्रिपदासाठी अडून बसल्याने अंतिम निर्णयाला विलंब लागला आहे. मात्र, आता हा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यास रिक्त होणारे पद शिवसेनेकडे सोपवण्याची तयारी काँग्रेसने दाखविल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम मानली जाणारी काँग्रेसची शक्ती प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे समजते.

नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्तीशी संबंधित काही मुद्द्यांमध्ये अध्यक्षपद हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने मान्य केले. विद्यमान अध्यक्षांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण, के. सी. पडवी, यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. अध्यक्षपद सोडायचे नाही, असे ठरल्यास अशोक चव्हाण किंवा नितीन राऊत यांच्याशी पटोलेंच्या जबाबदारीची आदलाबदल होऊ शकते. पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळेन पण, मंत्रिपद हवे असल्याची अट घातल्याचेही बोलले जाते. त्यामुळे हा पदबदलाचा प्रस्ताव चर्चेत आला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख