काँग्रेसमध्ये नाना पटोले पर्व सुरू; प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला - Nana Patole accepted the post of congress state president | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

काँग्रेसमध्ये नाना पटोले पर्व सुरू; प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

नाना पटोले यांनी आज प्रदेश कार्यालयात पदभार स्वीकारला असला ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे पदग्रहण सोहळा होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून पटोले यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. 

नाना पटोले यांनी आज प्रदेश कार्यालयात पदभार स्वीकारला असला तरी आज ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे पदग्रहण सोहळा होणार आहे. प्रदेशाध्यपदाचा पदभार स्वीकारण्याचा जाहीर कार्यक्रम अनेक वर्षात प्रथमच होत आहे. दरम्यान, प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये बाळासाहेब थोरात यांनी अधिकृतपणे पटोले यांच्याकडे पदाची सुत्रे दिली. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, एकनाथ गायकवाड, भाई जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९४२ मध्ये मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून ''अंग्रेजो चलो जावो, भारत छोडो'' हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाविषयी काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही उत्सुकता आहे. 

या कार्यक्रमाला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दु. आ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नाना पटोले यांनी  (४ फेब्रुवारी) रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या नंतर (५ फेब्रुवारी रोजी) काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. त्यानुसार आज त्यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष यांनीही पदभार स्वीकारला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख