मुंबई पोलिस उद्या घेणार रवी पुजारीचा ताबा - Mumbai Police to Take possession of Ravi Poojari Tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई पोलिस उद्या घेणार रवी पुजारीचा ताबा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

२०१६ च्या गजाली हॉटेलमधील गोळीबारप्रकरणी पुजारीला अटक करण्यात आली. खंडणीविरोधी पथकाला त्याचा ताबा मिळणार आहे. पुजारीविरोधात मुंबईत ४९ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २६ गुन्हे 'मोक्का' अंतर्गत आहेत. त्यामुळे त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते

मुंबई : गुंड रवी पुजारीचा ताबा सोमवारी घेण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांच्या मागणीनंतर स्थानिक न्यायालयाने त्याच्या ताबा देण्याबाबतचा निर्णय दिला आहे. दीड वर्षांपूर्वी पुजारीचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. यापूर्वी नोव्हेंबरमध्येही पुजारीचा १० दिवसांचा ताबा देण्यास स्थानिक न्यायालयाने होकार दिला होता. मात्र, त्यानंतर पुजारीने या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

२०१६ च्या गजाली हॉटेलमधील गोळीबारप्रकरणी पुजारीला अटक करण्यात आली. खंडणीविरोधी पथकाला त्याचा ताबा मिळणार आहे. पुजारीविरोधात मुंबईत ४९ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २६ गुन्हे 'मोक्का' अंतर्गत आहेत. त्यामुळे त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते. ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर बाबींत अडकून पडली. पुजारी सध्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे. पुजारीविरोधात बंगळूरुमध्ये ३९, मंगलोरमध्ये ३६, उडुपीत ११, म्हैसूर-हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

पुजारीविरोधात गुजरातमध्येही सुमारे ७५ गुन्हे दाखल आहेत. मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगारी विश्‍वातील हालचालींची तातडीने माहिती घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पुजारीच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होई शकतील. मुंबईत दाखल गुन्ह्यांप्रकरणी त्याचा ताबा घेण्यात घेण्यासाठी सोमवारी कायदेशीर बाबी पूर्ण करून त्याचा ताबा घेण्यात येणार आहे.

पुजारीने बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना धमकावले होते. २०१७- १८ ध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या. २००९ ते २०१३ दरम्यान पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात येते.

कर्नाटकातील प्रकरणांमध्येच ताबा
2015 मधील एका प्रकरणात पुजारीची दहा दिवसांची कोठडी मुंबई पोलिसांना मिळण्याबाबत कर्नाटक न्यायालयाने निर्णय दिला होता. मात्र, सेनेगल न्यायालयाने फक्त कर्नाटकातील प्रकरणांमध्ये पुजारीचा ताबा दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर सेनेगलमध्ये मुंबई पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने अर्ज करून परवानगी मिळवली होती.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख