शारीरिक तंदुरुस्तीअभावी मुंबई पोलिस कोरोनाबळी - Mumbai Police Attracting Corona Due to Lack of Physical Fitness | Politics Marathi News - Sarkarnama

शारीरिक तंदुरुस्तीअभावी मुंबई पोलिस कोरोनाबळी

अनिश पाटील
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

मुंबई पोलिस प्रशासनातर्फे दलातील कोरोनाबाधित पोलिसांचे अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याच्या अहवालानुसार, पोलिसांप्रमाणेच महापालिकेचे दीड लाख कर्मचारीदेखील कोरोना योद्‌ध्यांचे कर्तव्य बजावत आहेत. त्यात चतुर्थ श्रेणी कामगार व वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या दीड लाख कर्मचाऱ्यांमागे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण १०८ आहे. त्या तुलनेत ४६ हजारांच्या मुंबई पोलिस दलातील ५३ पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई :  शारीरिक तंदुरुस्तीचा अभाव हे मुंबई पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू होण्यामागे प्रमुख कारण आहे, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. तसेच, कोरोना काळात पोलिसांचे आरोग्य जपण्यासाठी ४० वर्षांवरील पोलिसांना अधिक जोखमीची व कमी जोखिमीची कामे आलटून पालटून द्यावीत. कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या क्षेत्रात कर्तव्य बजावल्यानंतर दोन ते तीन दिवसांची विश्रांती द्यावी, अशा शिफारशी या अहवालात करण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलिस प्रशासनातर्फे दलातील कोरोनाबाधित पोलिसांचे अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याच्या अहवालानुसार, पोलिसांप्रमाणेच महापालिकेचे दीड लाख कर्मचारीदेखील कोरोना योद्‌ध्यांचे कर्तव्य बजावत आहेत. त्यात चतुर्थ श्रेणी कामगार व वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या दीड लाख कर्मचाऱ्यांमागे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण १०८ आहे. त्या तुलनेत ४६ हजारांच्या मुंबई पोलिस दलातील ५३ पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे प्रमाण जवळपास कितीतरी अधिक असून त्यामागे शारीरिक तंदुरुस्तीतील कमतरता हे प्रमुख कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मुंबई पोलिसांच्या सशस्त्र पोलिस दलात सर्वाधिक ९८४ पोलिसांना कोरोची बाधा झाली आहे. मात्र, येथे केवळ एकाचा मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत वाहतूक विभागात १९७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील सात पोलिसांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण 13 टक्के आहे. सशस्त्र पोलिस दलात तरुणांचा भरणा असल्यामुळे त्यांनी लवकर कोरोनावर मात केली. तुलनेत वाहतूक पोलिस दलात वयस्कर पोलिस व त्रासदायक कामांमुळे तेथे मृतांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अधिक जोखमीची कामे तरुणांना द्यावीत, अशी शिफारस करण्यात आली आहे.

वारंवार कोरोना संसर्ग क्षेत्रात तैनात असल्यामुळे पोलिसांना कोरोना होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे ३५ ते ४० वर्षांवरील पोलिसांना अधिक जोखमीचे व कमी जोखमीची कामे आलटूनपालटून द्यावी. वाहतूक पोलिसांचे त्रासदायक काम लक्षात घेता तेथे तरुण पोलिसांची नियुक्ती करावी, अशा शिफारशीही अहवालात करण्यात आल्या आहेत.

सर्वेक्षणातील प्रमुख मुद्दे

-सशस्त्र पोलिस दलात सर्वाधिक ९८४ बाधित
- वाहतूक विभागाचा कोरोना मृत्युदर सर्वाधिक १३ टक्के
- ९८ टक्के बाधित पोलिस कोरोनामुक्त अथवा स्थिती गंभीर नसलेले
- मुंबईचा मृत्युदर ५.३ टक्के, तुलनेत पोलिसांचा मृत्युदर १.३४ टक्के
- सर्वाधिक बाधित पोलिस ठाणे : लोकमान्य टिळक (एल.टी) मार्ग (६५ बाधित)
- सर्वाधिक बाधित परिमंडळ : परिमंडळ ९ ( वांद्रे, जुहू, पाली हिल परिसर) २२१ बाधित पोलिस
- पश्‍चिम प्रादेशिक विभागात सर्वाधिक ५०८ बाधित
- गुन्हे शाखेत ११० पोलिस, तर आर्थिक गुन्हे शाखेत ३० पोलिसांना कोरोनाची बाधा
- गुप्तचर विभागातील ४९ पोलिसांना कोरोनाची बाधा
- संरक्षण व सुरक्षा विभागाचे २३१ पोलिस बाधित
- मोटर वाहतूक विभागात २१५ पोलिस बाधित, वायरलेस विभागात ६५ बाधित

अशा आहेत शिफारसी

- ४० वर्षांवरील पोलिसांसाठी कर्तव्यात बदल महत्त्वाचे
- अधिक जोखमीची, कमी जोखमीची कामे आलटून पालटून द्यावीत
- वाहतूक विभागात तरुण पोलिसांची आवश्‍यकता
- अधिक जोखमीची कामे तरुण पोलिसांना द्यावीत
- कोरोना संसर्ग क्षेत्रातील ड्युटीनंतर दोन ते तीन दिवसांची सुट्टी

दलातील कोरोनाची आतापर्यंतची स्थिती

मुंबईतील एकूण बाधित पोलिस : ४०८२
सक्रिय कोरोना बाधित : ६७०
बरे होऊन घरी : ३३७०
मृत्यू : ५५
कोरोनावर मात करून सेवेत रुजू : २६५१
कोरोनावर मात, पण अद्याप सेवेत रुजू नाहीत : ५१७
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख