मुंबईत आठवड्याभरात ४०० टॅक्‍सी, रिक्षा जप्त; लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरणे भोवले

४ मे रोजी मुंबईला रेड झोन जाहीर केल्यानंतर अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवसाय आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली; तरीसुद्धा काही बेजबाबदार रिक्षा आणि टॅक्‍सीचालक रस्त्यावर फिरताना पोलिसांना आढळले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे
Mumbai Police Action on Taxis' and Rikshaw's
Mumbai Police Action on Taxis' and Rikshaw's

मुंबई : मुंबईतील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत असताना प्रशासनाकडून लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र तरीही अवैधरीत्या रस्त्यावर टॅक्‍सी तसेच रिक्षा उतरवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आठवड्याभरात ४०० टॅक्‍सी आणि रिक्षा जप्त केल्या असून १२ लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन केले. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येनुसार रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन अशी विभागणी केली. ग्रीन झोनमधील सर्व व्यवहारांना सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली; तर ऑरेंज झोनमधील निवडक व्यवहार तेही कटेन्मेंट झोनवगळून परवानगी दिली; मात्र ४ मे रोजी मुंबईला रेड झोन जाहीर केल्यानंतर अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवसाय आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली; तरीसुद्धा काही बेजबाबदार रिक्षा आणि टॅक्‍सीचालक रस्त्यावर फिरताना पोलिसांना आढळले.

टॅक्सी चालकामुळे झाली होती ५ जणांना कोरोनाची लागण

मुंबईत यापूर्वी एका कोरोनाबाधिताने टॅक्‍सीने प्रवास केल्याने पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी १ ते ३० एप्रिलदरम्यान अवैधरीत्या व्यवसाय करणाऱ्या ६४७ टॅक्‍सी आणि रिक्षाचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २ लाख ९८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला; तर प्रवाशांना घेऊन धंदा करणाऱ्या १८ हजार ६४० रिक्षाचालकांवर कारवाई करत, ६२ लाख ६० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

तसेच ४ मार्च ते ११ मेदरम्यान पोलिसांनी रिक्षाचालक आणि टॅक्‍सीचालक यांच्यावर दोन वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाई केल्या आहेत. त्यातील पहिल्या कारवाईत प्रवासी घेऊन जाणे आणि दुसरी म्हणजे दुसऱ्याचे सामान पोहचवणे. पोलिसांनी प्रवाशांना घेऊन अवैध वाहतूक केल्याप्रकरणी १४ हजार ८१० जणांवर ई-चलानद्वारे कारवाई केली आहे. या कारवाईतून पोलिसांनी ५५ लाख ७१ हजारांचा दंड आकारला आहे; तर खासगी सामानांची ने-आण करणाऱ्या ५८९ रिक्षाचालकांवर कारवाई करत २ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.

अवैधरीत्या व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई

मुंबईत अवैधरीत्या धंदा करणाऱ्या ३ हजार ३६८ टॅक्‍सीचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या टॅक्‍सीचालकांकडून पोलिसांनी १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला आहे; तर अनेकदा कारवाई करूनही न ऐकणारे आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या ३३९ रिक्षा आणि ६१ टॅक्‍सीचालकांच्या टॅक्‍सी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. लॉकडाऊन असेपर्यंत आणि शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com