Mumbai Municipal Corporation, which is ruled by Shiv Sena, was appreciated by the Central Government for this! | Sarkarnama

केंद्र सरकारकडून शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे यासाठी झाले कौतुक ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 जून 2020

अनेक राज्यांनी केंद्राच्या प्रतिबंधात्मक धोरणाची अंमलबजावणी केल्याने त्याचा प्रभावी परिणाम झाला.

मुंबई : जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीसारख्या गजबजलेल्या वस्तीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि धारावीतील लोकप्रतिनिधींचे कौतुक केले आहे. 

मुंबईत कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नाही. पुणे, मुंबई, मालेगाव, भिवडी, अंबरनाथ आदी शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेदिवस वाढत आहे. भिवंडी आणि अंबरनाथमध्ये तर पुन्हा लोकडाऊन करण्यात येणार आहे. मुंबईनंतर दिल्लीत रुग्ण आहेत. केंद्राने सर्व राज्यांना कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. 

अनेक राज्यांनी केंद्राच्या प्रतिबंधात्मक धोरणाची अंमलबजावणी केल्याने त्याचा प्रभावी परिणाम झाला. राज्य सरकार, मुंबई महापालिका यांच्या प्रयत्न व प्रोत्साहनामुळे कोरोना प्रतिबंधांची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यश आले, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. 

अतिशय दाट लोकवस्तीच्या धारावीत दोन लाख 27 हजार 136 व्यक्ती/ स्क्वेअर कि.मी. एप्रिल 2020 मध्ये 491 रुग्ण आणि वाढीचा दर 12 टक्के होता; तर रुग्णदुपटीचा काळ होता 18 दिवस. महापालिकेने राबवलेल्या तत्पर उपायांमुळे कोव्हिड-19 रुग्णवाढीचा दर मे 2020 मध्ये 4.3 टक्केवर आला; तर जूनमध्ये हा दर आणखी कमी होऊन 1.02 टक्के झाला. 

या उपायांमुळे रुग्णदुपटीचा काळ वाढून, मे 2020 मध्ये 43 दिवस; तर जून 2020 मध्ये 78 दिवस झाला. 80 टक्के लोकसंख्या सार्वजनिक शौचालयावर अवलंबून असणाऱ्या धारावीत महापालिकेसमोर अनेक आव्हाने होती. 10 बाय 10 फुटाच्या घरात किंवा झोपडीत 8 ते 10 माणसे राहतात. याशिवाय या छोट्या घरांना दोन किंवा तीन मजले असतात. त्यात बरेचदा तळ मजल्यावर घर आणि वरच्या मजल्यावर कारखाना आणि अरुंद गल्ल्या असलेला हा परिसर. त्यामुळे शारीरिक अंतर राखण्यात मोठ्या मर्यादा आणि प्रभावी गृह अलगीकरणाची शक्‍यताच नाही. 

दाटीवाटीच्या या भागात जागेच्या मर्यादेमुळे गृह विलगीकरणाचा अपेक्षित प्रभावी परिणाम मिळाला नसल्याने शाळा, लग्न सभागृहे, क्रीडा संकुले यांसारख्या उपलब्ध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आल्या. या ठिकाणी नाष्टा, भोजन यासाठी कम्युनिटी किचन, अहोरात्र वैद्यकीय सेवा, आवश्‍यक औषधे आणि साधने पुरवण्यात आली. 

मुंबई महापालिकेच्या कोरोना प्रतिसाद धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर आणि कठोर अंमलबजावणी केली. याचे तीन प्राथमिक घटक आहेत, प्रभावी प्रतिबंधात्मक धोरण, सर्वसमावेशक तपासणी चाचण्या आणि जीवनावश्‍यक आणि इतर वस्तूंचा अखंडित पुरवठा सुनिश्‍चित करणे. केवळ अत्यवस्थ रुग्णांनाच धारावीबाहेर रुग्णालयात हलवण्यात आले. 

90 ट्‌के रुग्णांवर धारावीतच उपचार करण्यात आले. स्थानिक खासदार, आमदार आणि नगरसेवकांनीही अन्न आणि वाणसामान मोफत पुरवले. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात आणि सार्वजनिक शौचालयांत वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात आले. यामुळे लोकांच्या मनात असलेली भीती आणि शंका यांचे निरसन होण्यासाठी मदत होऊन सरकारच्या प्रयत्नांप्रती त्यांच्या मनात विश्‍वास वृद्धिंगत झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख