मुंबई : मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर यांनी आज पक्षाला घरचा आहेर दिला. कॉंग्रेस पक्षात गुणांची कदर होत नसल्याचे विधान त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत केले. एका पुस्तक प्रकाशन समारंभात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी खासदार भालचंद्र मुणगेकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये नेत्यांच्या मुलांनाच संधी मिळते, गुणांचे चीज होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुंबई कॉंग्रेसचे प्रमुखपद कुणाला द्यावे याविषयी सध्या विचारमंथन सुरू असतानाच चांदूरकर यांनी जाहीर वक्तव्य करीत पक्षाला अडचणीत आणले आहे. महाविकास आघाडीतील शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे वडील माजी खासदार एकनाथ गायकवाड सध्या मुंबईचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचे आधीचे प्रभारी जवळचे मित्र असल्याने गायकवाड कुटुंबाला संधी मिळते असे मानले जाते. नव्या अध्यक्षासाठी हालचाली सुरू असतानाच प्रा. चांदूरकर यांनी केलेले विधान पक्षात चर्चेचा विषय ठरले आहे.
दरम्यान, मुंबई कॉंग्रेसच्या विभाग अध्यक्षांना काल सुखद धक्का बसला. मुंबई अध्यक्ष निवडीसाठी त्यांचेही मत विचारत घेतले जात असून, त्यासाठी खास दिल्लीहून दूरध्वनी येत आहेत. मुंबई कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी पूर्ण वेळ अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. शहरात कॉंग्रेसचे २२७ विभाग अध्यक्ष असून त्यांना पक्षश्रेष्ठींकडून दूरध्वनी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात त्यांना भावी अध्यक्ष कोण असावा, असा प्रश्न विचारला जात आहे.
यापूर्वी महाराष्ट्र कॉंग्रेस आणि दिल्ली कॉंग्रेसपर्यंत पोच असलेला नेता मुंबईचा अध्यक्ष म्हणून निवडला जात होता. या निवड प्रक्रियेत विभाग अध्यक्षांचे मत फारसे लक्षात घेतले जात नव्हते. मात्र पहिल्यांदाच या निवड प्रक्रियेत दिल्लीहून विभाग अध्यक्षांचे मत लक्षात घेतले जात आहे. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मनजीतसिंह मनहास, आमदार भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, नसिम खान, मधू चव्हाण, तसेच चरणसिंह सप्रा यांचे नाव स्पर्धेत होते. मात्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहावर केवळ मनहास आणि भाई जगताप यांची भेटी घेतली. त्यामुळे हे दोघेही स्पर्धेत पुढे असल्याचे बोलले जात आहे. त्यातच मनहास यांनी यापूर्वी मुंबई कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या पदावर काम केलेले आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
जोर बैठका
अध्यक्षपदासाठी प्रभारी एच. के. पाटील यांनी आतापर्यंत पाच-सहा बैठका घेतल्या आहेत. आजी-माजी मंत्री आमदार यांच्याशी चर्चा केली. तसेच नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, माजी मुंबई अध्यक्ष यांचेही मत जाणून घेतले आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू आहे.
Edited By - Amit Golwalkar

