सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण - MP Sunil Tatkare Found Corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

राज्यात वरिष्ठ नेत्यांना कोरोनाची लागण होत असून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यानंतर आता खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसे ट्वीट तटकरे यांनी केले आहे. 

मुंबई : राज्यात वरिष्ठ नेत्यांना कोरोनाची लागण होत असून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यानंतर आता खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसे ट्वीट तटकरे यांनी केले आहे. 

काल माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील इस्पितळात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, असे ट्वीट सुनील तटकरे यांनी केले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ''दादा, लवकरात लवकर बरे होऊन आपण पुन्हा दुप्पट जोमाने लोकांच्या सेवेत दिवस-रात्र रुजू व्हाल. आरोग्याची काळजी घ्यावी. आम्ही सर्वच आपण बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत," असे तटकरे यांनी काल अजित पवार यांना उद्देशून म्हटले होते. आज त्यांना स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्यात मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपाय करीत, बैठकांचा सपाटा लावला होता. त्यात पहिल्या रुग्ण पुण्यात सापडला आणि त्यानंतर पुण्यातच कोरोना प्रमाणेबाहेर पसरल्याने पवार यांनी पुढाकार घेत, नवे उपाय आखले. आठवड्यातून एका किमान आठ-दहा तास बैठका घेत, पवार यांनी कोरोनावर मात करण्याची व्यूहरचना आखली.

त्याचवेळी गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विकासकामांनाही प्राधान्य देऊन पवार यांनी कामांना गती देण्याच्या हालचाली केल्या. याच काळात पवार हे राज्यभरातील अन्य शहरांमध्येही फिरत राहिले. तेव्हा, रोज अनेकजण त्यांच्या संपर्कात होते. याआधी त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र, ते निगेटिव्ह असल्याचे अहवाल आले. परंतु, मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा त्यांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली: तेव्हा त्यांचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आला.

दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही दौरे करत होते. नुकताच त्यांनी उस्मानाबादचा पूरस्थिती पाहणी दौरा केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली. आजपर्यंत बाहेर फिरत होतो. आता विश्रांती घ्यावी, अशी परमेश्वराची इच्छा दिसते असे सांगत फडणवीस सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख