MP Gopal Shetty Demands to Open National Park for Morning Walk | Sarkarnama

'मॉर्निंग वॉक'साठी नॅशनल पार्क उघडा  : खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 जुलै 2020

नॅशनल पार्कमध्ये जॉगिंगला जाणाऱ्यांना सुरक्षारक्षक अडवत असल्याचे कळल्याने  सकाळी गोपाळ शेट्टी यांनी स्वतः तेथे जाऊन पहाणी केली. त्यावेळी तेथे त्यांनी कोणीही अधिकारी भेटले नाहीत. रक्षकांनी त्यांची गाडी आतमध्ये सोडली, अशाच प्रकारे सामान्यांना अडवू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई : कोरोनाला पराभूत करण्यासाठी लोकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली रहावी यासाठी बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रस्ते निदान सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठी खुले करा, अशी मागणी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

''सरकारने आता व्यायामशाळांसह मॉर्निंग वॉक-जॉगिंग यास संमती दिली असून नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. हे उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवायला हरकत नाही, पण निदान सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी चालायला येणाऱ्यांसाठी तरी ते खुले करा. आता केंद्र सरकारने देशातील धार्मिक-ऐतिहासिक स्मारके खुली केली असताना नॅशनल पार्क मधील जॉगिंग एरिया बंद का ठेवला आहे, हा माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न आहे,'' असेही शेट्टी म्हणाले. 

येथे सोशल डिस्टन्सिंगचे व आरोग्याचे नियम पाळून धावपटूंना संमती द्या. नाहीतरी धडधाकट लोकच फिरायला येतात, आजारी व्यक्ती घराबाहेर पडणारच नाहीत, असेही ते म्हणाले.  उद्यानातील काही अधिकारी निवृत्त झाले असून त्याजागी अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नाही. अधिकारी भेटत नाहीत, कामे होत नाहीत, अशा लोकांच्या तक्रारी होत्या. मी देखील अनेकदा येथे दूरध्वनी करूनही कोणीही प्रतिसाद दिला नाही, असेही ते म्हणाले.

नॅशनल पार्कमध्ये जॉगिंगला जाणाऱ्यांना सुरक्षारक्षक अडवत असल्याचे कळल्याने  सकाळी शेट्टी यांनी स्वतः तेथे जाऊन पहाणी केली. त्यावेळी तेथे त्यांनी कोणीही अधिकारी भेटले नाहीत. रक्षकांनी त्यांची गाडी आतमध्ये सोडली, अशाच प्रकारे सामान्यांना अडवू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या घटनेसंदर्भात शेट्टी यांनी ध्वनीचित्रफीत काढून ती समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. आपली मागणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाईल व ते तिला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

या उद्यानात काही निवासी इमारती तसेच अंतर्भागात आदिवासी पाडे आहेत. या रहिवाशांनाच फक्त आतबाहेर करण्याची परवानगी आहे. काही महिन्यांपूर्वीच नॅशनल पार्कमध्ये सायकल चालविण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती, मात्र आता ती बंदच आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख