जान कुमार सानूला थोबडवणार : मनसेचा इशारा - MNS Leader Amaya Khopkar Warns Jaan Kumar Saanu | Politics Marathi News - Sarkarnama

जान कुमार सानूला थोबडवणार : मनसेचा इशारा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

मुंबईत राहून मराठी भाषेची चीड येते असे म्हणणाऱ्या जान कुमार सानूला आम्ही थोबडवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे

मुंबई : मुंबईत राहून मराठी भाषेची चीड येते असे म्हणणाऱ्या जान कुमार सानूला आम्ही थोबडवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे. बिग बाॅस सिझन १४ च्या सेटवर मराठी गायक राहुल वैद्य व जान सान यांच्यात वाद झाल्यानंतर जानने मराठी बाबत वक्तव्य केले होते. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बाॅलीवूडमध्ये नेपोटिझम (घराणेशाही)चा मुद्दा गाजत आहे. बिग बाॅसच्या घरातही आता हा वाद सुरु झाला आहे. नाॅमिनेशनची प्रक्रिया सुरु असताना राहुल वैद्यने जान सानूला नाॅमिनेट करत घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला. जान सानूला आपले वडील गायक कुमार सानू यांच्यामुळे एंट्री मिळाल्याचे राहुल म्हणाल्यानंतर जान सानू संतापला. त्यावेळी अन्य अमराठी कलाकार व राहुल वैद्य यांची बाचाबाची झाली. त्यावेळी जान सानूने मराठीबाबत वक्तव्य केले. 

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना संतापली आहे. " मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवणार लवकरच आता आम्ही मराठी. 
आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,'' असे ट्वीट करत खोपकर यांनी जान सानूला इशारा दिला.  जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला, असेही खोपकर यांनी म्हटले आहे. 
Edited By- Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख