मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक बनवण्यासाठी जुन्या महापौर बंगल्याची निवड करण्यात आली होती. मात्र अजूनही स्मारकाच बांधकाम सुरू होत नसल्याचा सवाल उपस्थित करत, 'महापौर बंगला की मातोश्री ३,' असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. तसे ट्वीट त्यांनी काही वेळापूर्वी केले आहे.
स्मारक की मातोश्री तीन?? pic.twitter.com/0KG8bpDk6J
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 17, 2020
तत्कालीन फडणवीस सरकारने दादर येथील महापौर निवासाच्या जागी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महापौरांचे निवासस्थान भायखळा येथील जिजामाता उद्यानातील अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्यात स्थलांतरित करण्यात आले आहे. स्मारकासाठी समितीही नियुक्त करण्यात आली असून स्मारक उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे सोपवण्यात आली आहे. त्यासाठी तब्बल १०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
महापौर निवास ही पुरातन वास्तू आहे. त्यामुळे त्याला धक्का न लावता जमिनीच्या खाली बांधकाम होणार आहे. निवासाच्या शेजारील जमिनीचाही वापर होणार आहे. स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात ७८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. स्मारकासाठी केलेल्या पहिल्या आराखड्याला अनुसरून निविदा काढण्यात आली होती. मात्र, वाढीव दर आल्याने पहिला प्रयत्न बारगळला. दरम्यानच्या काळात या आराखड्यात काही बदल करण्याची सूचना समितीने केली. त्यानंतर पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. या साऱ्यामुळे स्मारकाचे बांधकाम लांबले आहे. त्यावर मनसेने टीका केली आहे.
दरम्यान, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली देण्यासाठी आजच्या दिवशी दरवर्षी अनेक शिवसैनिक शिवतीर्थावर येतात. अनेक राजकीय पक्षांचे नेतेही आवर्जून येतात. मागच्या वर्षी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या नेत्यांनीही स्व. बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मात्र या वेळी सत्तेतली समीकरणे बदलल्याने भाजपचे नेते उपस्थित राहतील का? अशी कुजबुज शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.
सत्तेची समीकरणे बदलली#Shivsena #BJP #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/VgaRm5NxlV
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 17, 2020
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे. आज शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी अनेक शिवसैनिक जातात. शिवाय मोठी फुलांची रांगोळी देखील काढली जाते, मात्र, यंदा कोरोना परिस्थितीमुळे लहान रांगोळी काढत 'साहेब परत या' अशी हाक लिहून आदरांजली वाहण्यात आली आहे.
Edited By - Amit Golwalkar

