आमदार निधीच्या खर्चाचे नियम बदलणार : अजित पवार

स्थानिक विकास कार्यक्रमांचा भाग म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने राज्यातील प्रत्येक आमदारास मिळणारा निधी कोणत्या कामांवर खर्च करायचा, यासंदर्भातील नियम लवकरच बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे.
MLA will change the rules for spending funds: Ajit Pawar
MLA will change the rules for spending funds: Ajit Pawar

मुंबई : स्थानिक विकास कार्यक्रमांचा भाग म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने राज्यातील प्रत्येक आमदारास मिळणारा निधी कोणत्या कामांवर खर्च करायचा, यासंदर्भातील नियम लवकरच बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. 

राज्यात विधान सभेतील 288 आणि विधान परिषदेतील 78 आमदारांना वर्षाला प्रत्येकी दोन कोटी रुपये इतका निधी दिला जातो. तो आमदारांनी त्यांच्या, त्यांच्या मतदारसंघात स्थानिक विकास कार्यक्रमांसाठी खर्च करायचा असतो. त्याचे निश्‍चित असे नियम आहेत. मात्र, या नियमांत बदल करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून आमदार करत होते. 

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार निधीत बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय 2006 मध्ये झाला होता. भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 2016 मध्ये त्यासंदर्भातील नियम बनवण्यासाठी मंत्र्यांची उपसमिती स्थापन झाली होती. मात्र, त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर नव्या मंत्र्यांचा समावेश असलेल्या उपसमितीची रचना करण्यात आली आहे. नव्या समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत; तर एकनाथ शिंदे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, हसन मुश्रीफ, शंभूराज देसाई हे सदस्य आहेत. नियोजन विभागाने सोमवारी त्यासंदर्भातला सरकारी निर्णय काढला आहे. 

पवारांविरोधात लोकसभा लढलेले जाचक राष्ट्रवादीच्या गोटात 

बारामती : राज्य सहकारी संघाचे माजी अध्यक्ष आणि सहकारातील दिग्गज पृथ्वीराज जाचक हे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यापासून दुरावले होते. पण, तेच जाचक आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाचक यांनी पवारांसमवेत दुपारचे जेवण घेतले. गेल्या काही महिन्यांपासून जाचक यांना पवारांसोबत आणण्यासाठी प्रयत्न करणारे बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी चालवलेली मोहीम अखेर सोमवारी (ता. 3 ऑगस्ट) दुपारी यशस्वी झाली आणि जाचक यांनी अजित पवार यांच्यासमवेत काम करण्याचे जाहीर केले. 

शरद पवार व पृथ्वीराज जाचक यांच्यात मुंबईत सोमवारी सविस्तर चर्चा झाली. किरण गुजर हेही या प्रसंगी उपस्थित होते. छत्रपती सहकारी साखर कारखान्यात आपल्याला डावलले जात असल्याच्या भावनेतून जाचक यांनी पवारांसोबत काडीमोड घेत वेगळी चूल मांडली होती. 

हा विरोध इतका टोकाचा बनला होता की पृथ्वीराज जाचक यांनी थेट लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनाच आव्हान दिले होते. मात्र, कालांतराने राजकीय स्थिती बदलली. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जाचक यांचा विरोध कायम होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आणि पृथ्वीराज जाचक यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. शरद पवार यांनीही आज त्याला हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे जाचक आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात पवार कुटुंबीयांसोबत असतील, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com