भातखळकरांची जीभ घसरली...कोरोना देशमुखांना झालाय, की त्यांच्या मेंदूला? - Mla Atul Bhatkhalkar criticise Home minister over celebrity tweets | Politics Marathi News - Sarkarnama

भातखळकरांची जीभ घसरली...कोरोना देशमुखांना झालाय, की त्यांच्या मेंदूला?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जळजळीत टीका केली.

मुंबई : भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जळजळीत टीका केली. ''लतादीदी व सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटची चौकशी करण्याचे देशमुख यांचे विधान ऐकून कोरोना त्यांना झालाय की त्यांच्या मेंदूला झालाय, असा प्रश्न पडतो, अशा शब्दांत भातखळकर यांनी देशमुखांना टोला लगावला.

शेतकरी आंदोलनावरून सुरू झालेल्या ट्विटर वॉरची गुप्तहेर विभागामार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून आता वाद निर्माण झाला असून भाजप नेत्यांकडून सरकारवर टीका करण्यात आली आहे. भातखळकर यांनी ट्विटरवर व्हिडियो प्रसारित करून टीका केली आहे.

केवळ मत्सर आणि द्वेषापोटी हे महाभकास आघाडी सरकार देशाचे भूषण असलेल्या मान्यवरांविरोधात कारवाई करू पहात आहे. यावरून या सरकारचे डोके किती फिरले आहे हे तर स्पष्ट आहे, पण कोरोना नेमका कोणाला झालाय, अनिल देशमुखांना की त्यांच्या मेंदूला, असा प्रश्न पडत असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे. 

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्यासह सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. ''संतापजनक, कुठे गेला मराठीबाणा, कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे,'' असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी ट्विट करून सरकारवर टीका केली. ''ठाकरे-पवार सरकारला वेड लागलं आहे का? तारतम्य राहिलं आहे की नाही?'' असे ट्विटमध्ये म्हटले आहे. '' मंगेशकर, सचिन तेंडूलकर, अक्षय कुमार सुनिल शेट्टी यांनी देशाच्या एकतेबद्ल ट्विट केले आहे. काँग्रेस पक्ष आपल्या देशाला बदनाम करणाऱ्यांचा प्रवक्ता बनला आहे. पण या निर्णयामुळे काँग्रेसला देशापेक्षा आपल्या पक्षावर जास्त प्रेम आहे. देशहितासाठी ट्विट करणे गुन्हा आहे का? लतादीदी आणि सचिनची माफी मागून हा निर्णय मागे घ्यावा,'' असे राम कदम यांनी म्हटले आहे. 

मोदी सरकार टाकतेय दबाव - काँग्रेसचा आरोप

कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं आहे.  याला उत्तर म्हणून सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेकांनी ट्विट केले. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत विरोधी प्रपोगंडा राबविली जात असल्याचा दावा केला होता. त्यावेळी '#IndiaTogether' '#IndiaAgainstPropoganda' असे हॅशटॅग वापरण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच देशातील सेलिब्रिटींनी हे हॅशटॅक वापरून रिहाना व ग्रेटला विरोध करणारे ट्विट केले. 

काँग्रेसने याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना संबंधित ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्व सेलिब्रिटींचे ट्विट एकसारखेच असल्याने केंद्र सरकारनेच त्यांच्यावर दबाव आणला होता, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळे या ट्विटच्या अनुषंगाने भाजप नेत्यांची चौकशी करावी, असे सावंत यांनी म्हटले आहे. या सेलिब्रिटींवर केंद्र सरकारकडून दबाव टाकला जात आहे. हे भाजपनेच केल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे या सेलिब्रिटींना संरक्षण देण्याची गरज असल्याची मागणी सावंत यांनी केली. 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले....

शेतकरी आंदोलनावर देशातील सेलिब्रिटींनी एकाच वेळा ट्विट करण्यासाठी दबाव टाकला आहे का, याची चौकशी केली जाईल. या सेलिब्रिटींच्या ट्विट एकाच वेळी कशा आल्या, सायना नेहवाल व अक्षय कुमार यांची ट्विट एकासारखीच दिसतात. त्यामुळे हे ठरवून घडवण्यात आले का? याची चौकशी केली जाईल, असे देशमुख म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख