By Mistake BMC Put Containment Zone Board on Court Building | Sarkarnama

...अन्‌ काही क्षण न्यायालय झाले सील!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 जून 2020

कोरोनाचा संसर्ग मुंबईमध्ये वाढत असताना बुधवारी मुंबई महापालिकेने चक्क एका न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच कंटेन्मेंट झोनचा फलक झळकावण्याची 'कामगिरी' केली. मात्र, झालेली चूक लक्षात आल्यावर तातडीने फलक हटविण्यातही आला.

मुंबई  : कोरोनाचा संसर्ग मुंबईमध्ये वाढत असताना बुधवारी मुंबई महापालिकेने चक्क एका न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच कंटेन्मेंट झोनचा फलक झळकावण्याची 'कामगिरी' केली. मात्र, झालेली चूक लक्षात आल्यावर तातडीने फलक हटविण्यातही आला.

धोबीतलाव येथील लघुवाद न्यायालयाच्या मागे असलेल्या कर्मचारी वसाहतीत कोरोनाचा रुग्ण आढळल्याने तेथे हा फलक लावणे अपक्षित होते. मात्र, चुकीने तो न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला होता. ही चूक लक्षात आल्यावर तत्काळ दुरुस्त करण्यात आली. एखाद्या इमारतीत कोविड-१९ चा रुग्ण आढळल्यावर संबंधित फ्लॅट, घर, मजला, विंग अथवा संपूर्ण इमारत सील केली जाते. तेथे खबरदारीचा उपाय म्हणून फलक लावून नागरिकांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला जातो. तसेच नागरिकांच्या वावरावरही अशा ठिकाणी निर्बंध आणले जातात.

धोबीतलाव येथील लोकमान्य टिळक मार्गावर हे न्यायालय आहे. न्यायालयामागील वसाहतीत कोरोना रुग्ण आढळल्याने ती वास्तू सील केली असल्याचा फलक लावण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. एका वकिलाला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र,  संबंधित इमारतीवर फलक न लावता तो  न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आल्याने गोंधळ उडाला.

फोटो व्हायरल झाल्याने गोंधळ

संबंधित कर्मचाऱ्याच्या ही चूक लक्षात आली. त्यावेळी त्याने तो फलक तेथून काढून पुन्हा संबंधित वसाहतीत जाऊन लावला. घडलेल्या या प्रकाराला पालिकेच्या 'सी' विभाग कार्यालयातून दुजोरा मिळाला आहे. हा फलक काढला जाईपर्यंत  न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर फलक लावतानाचे फोटो व्हायरल झाल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख