'एमपीएससी'ची याच वर्षी होणार परीक्षा; परीक्षा केंद्रांचा घेतला जातोय आढावा - Maharashtra News MPSC Planning to take Examinations This Year Only | Politics Marathi News - Sarkarnama

'एमपीएससी'ची याच वर्षी होणार परीक्षा; परीक्षा केंद्रांचा घेतला जातोय आढावा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 जून 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून प्रत्येक बाबतीत सोशल डिस्टन्स पाळला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित करण्यापूर्वी अगोदरची परीक्षा केंद्रे, कोरोनासाठी गुंतलेल्या परीक्षा केंद्रांवरील इमारती आणि भविष्यात परीक्षेसाठी उपलब्ध होणाऱ्या वर्ग खोल्या, परीक्षेला बसणारे अंदाजित विद्यार्थी याचा ताळमेळ एमपीएससीकडून घातला जात आहे

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) 26 मार्चला होणारी राज्य सेवेची पूर्व परीक्षा कोरोनामुळे रद्द करावी लागली. मात्र, आता 'युपीएससी'च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता परीक्षा केंद्रांची उपलब्धता अन्‌ केंद्र व राज्य शासनाच्या अन्य विभागांच्या परीक्षांच्या तारखांचा आढावा घेऊन वेळापत्रक निश्‍चित करण्याच्या तयारीला वेग आला आहे. डिसेंबरपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होतील आणि काही दिवसांत वेळापत्रकही जाहीर होईल, असे 'एमपीएससी'च्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्य सेवेची पूर्व परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक व मंत्रालयीन सहायक या पदांची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक 'एमपीएससी'कडून निश्‍चित केले जात आहे. दरम्यान, बहूतांश विद्यार्थी युपीएससी, एमपीएससीसह राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करीत असतात. त्यामुळे त्या परीक्षांच्या तारखा सोडून परीक्षा कोणत्यावेळी घेणे विद्यार्थ्यांसह 'एमपीएससी'ला सोयीस्कर होईल,

जिल्हाबंदीचा परिणाम होणार?

पुरेशा प्रमाणात परीक्षक उपलब्ध होतील का, याचे नियोजन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे जिल्हाबंदीचा परीक्षांवर काही परिणाम होईल का, याचीही स्थिती जाणून घेतली जात आहे. मात्र, डिसेंबरपर्यंत निश्‍चितपणे 'एमपीएससी'ची परीक्षा घेतली जाईल, असा विश्‍वासही उपसचिव कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्‍त केला.

सोशल डिस्टन्समुळे परीक्षा केंद्र वाढतील

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून प्रत्येक बाबतीत सोशल डिस्टन्स पाळला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित करण्यापूर्वी अगोदरची परीक्षा केंद्रे, कोरोनासाठी गुंतलेल्या परीक्षा केंद्रांवरील इमारती आणि भविष्यात परीक्षेसाठी उपलब्ध होणाऱ्या वर्ग खोल्या, परीक्षेला बसणारे अंदाजित विद्यार्थी याचा ताळमेळ एमपीएससीकडून घातला जात आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाणार असल्याने परीक्षा केंद्रे तथा वर्गांची संख्या वाढणार असून त्यासाठी परीक्षकही ज्यादा लागतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील दोन लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) तयारी करीत आहेत. कोरोनामुळे दोनदा परीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले. तरीही आता 'युपीएससी'चे वेळापत्रक जाहीर झाले असून आणखी केंद्र व राज्य सरकारच्या अन्य कोणत्या विभागांच्या परीक्षा आहेत का, याचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आता 'एमपीएससी'च्या परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित होईल - गीता कुलकर्णी, प्रभारी उपसचिव, एपीएससी, मुंबई

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख