ठाकरे सरकारला वेड लागलंय का?... - Maharashtra Home Minister Anil Deshmukh orders probe into celebrities tweets | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकारला वेड लागलंय का?...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

शेतकरी आंदोलनावरून सुरू झालेल्या ट्विटर वॉरची गुप्तहेर विभागामार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून आता वाद निर्माण झाला असून भाजपकडून सरकारवर टीका करण्यात आली आहे.

मुंबई : शेतकरी आंदोलनावरून सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची गुप्तहेर विभागामार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून आता वाद निर्माण झाला असून भाजपकडून सरकारवर टीका करण्यात आली आहे. ''ठाकरे सरकारला वेड लागलंय का?'' अशा शब्दांत भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी निशाना साधला. तर लतादीदी, सचिनची माफी मागून निर्णय मागे घेण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केले होते. या ट्विटनंतर लता मंगेशकर यांच्यासह सचिन तेंडूलकर, कंगना राणावत, रोहित शर्मा, विराट कोहली अशा अनेक सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक ट्विट करून त्यांना विरोध केला. आता या ट्विटची राज्याचा गुप्तहेर विभाग चौकशी करणार आहे. केंद्र सरकारच्या दबावामुळे हे ही ट्विट करण्यात आला का? हे गुप्तहेर विभाग तपासणार आहे. काँग्रेसने ही मागणी केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले.

गृहमंत्र्यांच्या आदेशावरून आता वाद निर्माण झाला आहे. भाजपने या मुद्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी ट्विट करून सरकारवर टीका केली. ''ठाकरे-पवार सरकारला वेड लागलं आहे का? तारतम्य राहिलं आहे की नाही?'' असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

'' मंगेशकर, सचिन तेंडूलकर, अक्षय कुमार सुनिल शेट्टी यांनी देशाच्या एकतेबद्ल ट्विट केले आहे. काँग्रेस पक्ष आपल्या देशाला बदनाम करणाऱ्यांचा प्रवक्ता बनला आहे. पण या निर्णयामुळे काँग्रेसला देशापेक्षा आपल्या पक्षावर जास्त प्रेम आहे. देशहितासाठी ट्विट करणे गुन्हा आहे का? लतादीदी आणि सचिनची माफी मागून हा निर्णय मागे घ्यावा,'' असे राम कदम यांनी म्हटले आहे. 

मोदी सरकार टाकतेय दबाव - काँग्रेसचा आरोप

कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं आहे.  याला उत्तर म्हणून सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेकांनी ट्विट केले. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत विरोधी प्रपोगंडा राबविली जात असल्याचा दावा केला होता. त्यावेळी '#IndiaTogether' '#IndiaAgainstPropoganda' असे हॅशटॅग वापरण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच देशातील सेलिब्रिटींनी हे हॅशटॅक वापरून रिहाना व ग्रेटला विरोध करणारे ट्विट केले. 

आता काँग्रेसने याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना संबंधित ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्व सेलिब्रिटींचे ट्विट एकसारखेच असल्याने केंद्र सरकारनेच त्यांच्यावर दबाव आणला होता, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यामुळे भाजप या ट्विटच्या अनुषंगाने भाजप नेत्यांची चौकशी करावी, असे सावंत यांनी म्हटले आहे. या सेलिब्रिटींवर केंद्र सरकारकडून दबाव टाकला जात आहे. हे भाजपनेच केल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे या सेलिब्रिटींना संरक्षण देण्याची गरज असल्याची मागणी सावंत यांनी केली. 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले....

शेतकरी आंदोलनावर देशातील सेलिब्रिटींनी एकाच वेळा ट्विट करण्यासाठी दबाव टाकला आहे का, याची चौकशी केली जाईल. या सेलिब्रिटींच्या ट्विट एकाच वेळी कशा आल्या, सायना नेहवाल व अक्षय कुमार यांची ट्विट एकासारखीच दिसतात. त्यामुळे हे ठरवून घडवण्यात आले का? याची चौकशी केली जाईल, असे देशमुख म्हणाले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख