राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी आज विचारमंथन : शरद पवार करणार मार्गदर्शन - Maharashtra Cabinet to Meet today to discuss about Economic Situation | Politics Marathi News - Sarkarnama

राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी आज विचारमंथन : शरद पवार करणार मार्गदर्शन

मृणालिनी नानिवडेकर 
बुधवार, 27 मे 2020

कोरोनाच्या परिस्थितीमुळे आणि चार लाॅकडाऊनमुळे संपूर्ण देशात आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता वरिष्ठ नेत्यांच्या व मंत्र्यांच्या पातळीवर या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी विचार विनिमय सुरु झाला आहे

मुंबई : राज्यात कोरोनामुळे असलेला लॉक डाउन कायम असतानाही अर्थचक्र सुरु करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत आज सत्ताधारी नेते विचारविनिमय करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेते व मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ११ वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. 

कोरोनाच्या परिस्थितीमुळे आणि चार लाॅकडाऊनमुळे संपूर्ण देशात आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता वरिष्ठ नेत्यांच्या व मंत्र्यांच्या पातळीवर या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी विचार विनिमय सुरु झाला आहे. चवथ्या लाॅकडाऊनमध्ये काही शिथिलता आली असली तरीही कोरोनाची आजची स्थिती पाहता त्यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. 

आज राज्यातले सत्ताधारी नेते व मंत्री याबाबत विचारमंथन करणार असून त्यात केंद्र सरकारचे पॅकेज, परप्रांतिय मजुरांना परत पाठवण्याबाबत रेल्वे संदर्भात होत असलेला वाद यावरही या वेळी चर्चा होणार असल्याचे समजते. मुंबईची कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे येथील वास्तव सुधारण्याची गरज असल्याचे वारंवार लक्षात आणून दिले जात आहे. त्याबाबतही विचार होईल, असे सांगण्यात येते. नागरिक सुरक्षित रहावेत यासाठी लाॅकडाऊन आवश्यक असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ठाम भूमीका आहे. मात्र, राज्यात अर्थचक्र सुरु करावे हे त्यांनीही लक्षात घेतले आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकूण परिस्थितीबाबत वारंवार मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी मांडलेल्या विचारांनुसार आता पावले टाकली जात आहेत. एकूण परिस्थिती आणि उपाय योजना याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दरम्यान काही मतभेद असले तरीही त्याविषयी आज चर्चा होईल, असे सांगण्यात आले आहे.  केंद्र सरकारने नक्की किती मदत दिली आहे, याच्याही तपशीलावर चर्चा होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख