Letter to BJP Chief Minister to open Jain temples during Paryushan period | Sarkarnama

पर्यूषण काळात जैन मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 20 जुलै 2020

जैन समाजाचा सर्वात मोठा धार्मिक सण असलेल्या पर्यूषण काळात जैन मंदिरे खुली करावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दहिसरचे नगरसेवक हरीष छेडा यांनी केली आहे.

मुंबई ः जैन समाजाचा सर्वात मोठा धार्मिक सण असलेल्या पर्यूषण काळात जैन मंदिरे खुली करावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दहिसरचे नगरसेवक हरीष छेडा यांनी केली आहे. 

छेडा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. कोरोनाच्या साथीत सरकारच्या आदेशामुळे सारीच प्रार्थनास्थळे बंद आहेत. सध्या आपण अनलॉकिंगच्या काळात आहोत, दुकाने-कार्यालये-व्यायामशाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे निदान १६ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट या पर्युषण काळात तरी आरोग्यविषयक निर्बंधांसह जैन मंदिरे खुली करावीत, असे त्यांनी म्हटले आहे. आधीच नोंदणी करून कोणी कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी मंदिरात यावे, ही व्यवस्था करता येईल, असेही त्यांनी सुचवले आहे. 

अनेक जैन भाविक, संघटना आदींनी छेडा यांच्याकडे ही मागणी केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. या काळात भाविकांना मास्क, सॅनिटायझरने हात धुणे, सामाजिक अंतर राखणे, तापमान-ऑक्सिजन पातळी तपासणी आदी निर्बंध पाळून मंदिरात जाण्याची संमती द्यावी.

सरकारने नुकतीच बकरी ईद सणाला सशर्त संमती दिली आहे, तर गणेशोत्सवालाही काही अटींसह संमती देण्यात आली आहे. ‘श्री’च्या मंडपात भाविकांना पुरेशी काळजी घेऊन सोडण्यासही संमती मिळाली आहे. त्याच धर्तीवर पर्यूषण काळात सर्व आरोग्यविषयक नियम पाळून जैन मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, असेही छेडा यांनी म्हटले आहे. 

सरकारने सुवर्णमध्य काढावा : शहा 

पर्यूषण पर्व हे जैन समाजाचे सर्वात मोठे धार्मिक पर्व असते, या काळात सर्व प्रकारची तपश्चर्या होते, उपवास होतात, वर्षभरात जाणते-अजाणतेपणी कोणाला दुखावले असेल तर त्याबद्दल मनापासून माफीही मागितली जाते. पर्यूषणपर्व हा धार्मिकतेचा परमोच्च बिंदू असतो, अर्थात सध्याची परिस्थिती पाहता धार्मिक स्थळातील प्रवेशाला नेहमीसारखी परवानगी मिळणार नसली तरी निदान काही अटी घालून, निर्बंध लावून भाविकांना संमती मिळावी व धर्म कार्य करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी, असे उच्च न्यायालयातील वकील व मुंबईतील अनेक जैन मंदिरांचे विश्वस्त प्रफुल्ल शहा यांनी सांगितले. 

पर्यूषणाच्या शेवटच्या दिवशी गुरुमहाराजांच्या मार्गदर्शनाखाली जैन भाविकांची प्रतिक्रमण ही क्रिया (प्रार्थना) देखील असते. यावर्षी सरकारने धार्मिक श्रद्धा आणि आरोग्यविषयक निर्बंध यात काहीतरी सुवर्णमध्य काढावा. भाविकांना रांग लावून, अंतर ठेऊन, आरोग्यविषयक नियम पाळून मंदिरात जाऊ द्यावे. बहुतेक जैन मंदिरे भरपूर मोठी आहेत, आवारातही मंडप टाकून भाविकांची व्यवस्था करता येईल. त्यामुळे निदान पर्यूषण काळात तरी निर्बंध पाळून भाविकांना मंदिर प्रवेश द्यावा, असेही शहा म्हणाले. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख