Let's celebrate Ganeshotsav simply by implementing socially useful programs: Uddhav Thackeray | Sarkarnama

समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करूया : उद्धव ठाकरे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 जून 2020

आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबई : यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळाला केले आहे.

आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री  सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री म्हणाले, आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सांगितले की, ज्याप्रमाणे पुण्यातील गणेश मंडळांनी  गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले आहे त्याचे स्वागत. या निर्णयाचे सर्वांनी अनुकरण करावे व त्याचे पालन करावे. 

 कोरोना विरुद्धची लढाई गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. आपले पोलिस थोडे थकले आहे पण त्यांची हिंमत हरलेली नाही. गणेशोत्सवासाठी साठी राज्याचे पोलिस दल तयार,सुसज्ज आहे अशी निःसंदिग्ध ग्वाही गृह मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली. या बैठकीस राज्याच्या सर्वच भागातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख