जोगेश्‍वरीत भूखंड घोटाळा; मुख्यमंत्र्यांचा दबाव असल्याचा सोमय्यांचा आरोप - Kirit Somayya Alleges involvement of CM Uddhav Thackeray in Jogeshwari Land Scam | Politics Marathi News - Sarkarnama

जोगेश्‍वरीत भूखंड घोटाळा; मुख्यमंत्र्यांचा दबाव असल्याचा सोमय्यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

मुंबईत अंतर्गत रस्त्यांसाठीच्या भूखंडासाठी टीडीआर देण्याचे मुंबई महापालिकेचे धोरण असताना जोगेश्‍वरीच्या कमाल अमरोही स्टुडिओच्या जमिनीसाठी महापालिकेने ७४ कोटी रुपये रोख द्यावेत, असा दबाव मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणण्यात येत आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे

मुंबई :  मुंबईत अंतर्गत रस्त्यांसाठीच्या भूखंडासाठी टीडीआर देण्याचे मुंबई महापालिकेचे धोरण असताना जोगेश्‍वरीच्या कमाल अमरोही स्टुडिओच्या जमिनीसाठी महापालिकेने ७४ कोटी रुपये रोख द्यावेत, असा दबाव मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणण्यात येत आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर दहिसर येथील एक भूखंड खासगी विकासकाकडून घेण्यासाठी महापालिकेने ३४९ कोटी रुपये दिले असून, हा विकासक त्यासाठी आणखी ९०० कोटी रुपये मागत असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर हा दुसरा भूखंड घोटाळा उघड झाल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. विकासक काहीही मागण्या करतील; मात्र महापालिकेने खासगी व्यक्तींना भूखंडांपोटी भरमसाठ पैसे देण्यासाठी कोणीही दबाव आणणे निषेधार्ह आहे, असेही ते म्हणाले.

महाल पिक्‍चर्सतर्फे अमरोही स्टुडिओतील या भूखंडासाठी पालिकेला २०१८ मध्ये प्रस्ताव दिला होता. हा भूखंड जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोडवर मातोश्री क्‍लबच्या समोर आहे. गेली २० वर्षे रस्त्यासाठी लोक त्याचा वापर करत आहेत. जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड केव्हज्‌ चौकात एका विकासकाचा प्रकल्प आहे. त्यासाठीच्या अंतर्गत रस्त्यासाठी प्रस्ताव आहे. गेली दोन वर्षे त्यासाठी टीडीआरचा विचार चालू होता; पण पालिकेने अमरोही स्टुडिओच्या या भूखंडासाठी ७४ कोटी ७ लाख ५ हजार २३७ रुपये द्यावेत, असा आग्रह महाल पिक्‍चर्सनी नुकताच धरला आहे. याबाबत गेल्या काही दिवसांत पालिकेच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून महाल पिक्‍चर्सला रोखीने भरपाई द्यावी म्हणून दबाव आणला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः रस घेतला आहे आणि ठाकरे सरकारच्या आवडत्या विकासकासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत, असाही आरोप सोमय्या यांनी केला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख