नाईक परिवाराशी असलेल्या संबंधाचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा - किरीट सोमय्या - Kirit Somaiyya Demands Explanation from CM Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

नाईक परिवाराशी असलेल्या संबंधाचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा - किरीट सोमय्या

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

अर्णब गोसावी यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर अन्वय नाईक परिवार आणि ठाकरे परिवार यांच्यातील आर्थिक संबंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपा नेते डॉ.किरीट सोमैय्या यांनी केली आहे

मुंबई : अर्णब गोसावी यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर अन्वय नाईक परिवार आणि ठाकरे परिवार यांच्यातील आर्थिक संबंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपा नेते डॉ.किरीट सोमैय्या यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले, ''या दोन परिवारामधील जमीन व्यवहाराचे २१ सातबारा उतारे समोर आले आहेत. गाव कोर्लई, तालुका मुरुड, जिल्हा रायगड येथील अन्वय नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांनी २१ प्लॉट श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे व श्रीमती मनिषा रविंद्र रायकर यांना विकले असल्याचे कागदपत्रांवरून दिसते. यातील काही जमीन वन, खाजगी वने असल्याचे वाटते. या जमिनीस वनेतर वापरास बंदी आहे. वनेतर वापरासाठी केंद्र शासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे,''

सोमय्या पुढे म्हणाले, "या जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे  व श्रीमती मनिषा रविंद्र वायकर यांची नावे आहेत. श्री. रविंद्र वायकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते  मंत्रीही होते. श्रीमती मनिषा ह्या श्री. रविंद्र वायकरांच्या पत्नी आहेत. श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे व श्रीमती मनिषा रविंद्र वायकर यांचे संबंध आर्थिक आहेत, व्यवसायिक आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो.

याबाबत सोमय्या यांनी खालील मुद्दे उपस्थित करत त्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी केली 
- श्रीमती उद्धव ठाकरे व श्रीमती मनिषा रविंद्र वायकर यांचा या जमीन घेण्यामागचा उद्देश/उदिष्ट काय?

- नाईक परिवाराचे उद्धव ठाकरे परिवाराशी यांचे एवढे घनिष्ठ संबंध, व्यक्तिगत संबंध, आर्थिक संबंध, व्यावसायिक या बाबत स्पष्टता येणे गरजेचे आहे.

- या जमिनी शेती करण्यासाठी घेण्यात आल्या, शेती व्यवसायसाठी, जमीन व्यवसायासाठी की गुंतवणुकीसाठी.

- अशा प्रकारचे आणखीन किती जमीन व्यवहार ठाकरे परिवाराचे झाले आहेत?

- रश्मी उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार आणि श्रीमती मनिषा रविंद्र वायकर, वायकर परिवार यांचा हा एकच संयुक्तिक, आर्थिक जमीन व्यवहार आहे की, या दोन परिवाराचे असे अनेक आर्थिक, व्यवसायिक. गुंतवणुकीचे अन्य ही व्यवहार झाले आहेत?
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख