Kabaddi will not be Started in Near Future | Sarkarnama

कबड्डी सुरु करण्याचा सध्या विचारही नाही; कबड्डीप्रेमींची होणार निराशा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

देशात क्रीडा सराव, शिबिरे, स्पर्धा सुरू करण्यास हळुहळू सुरुवात होत आहे; पण गेल्या काही वर्षात जास्तच लोकप्रिय झालेली कबड्डी सुरू करण्याबाबत अद्याप कुठलाही विचार झालेला नाही. कबड्डीच्या खेळाचे स्वरूप पाहिले तर खेळ सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे करूनही काही साधणार नाही

मुंबई : देशात क्रीडा सराव, शिबिरे, स्पर्धा सुरू करण्यास हळुहळू सुरुवात होत आहे; पण गेल्या काही वर्षात जास्तच लोकप्रिय झालेली कबड्डी सुरू करण्याबाबत अद्याप कुठलाही विचार झालेला नाही. कबड्डीच्या खेळाचे स्वरूप पाहिले तर खेळ सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे करूनही काही साधणार नाही, त्यामुळे ते केले नसल्याचे निवृत्त न्यायाधीश एस. पी. गर्ग यांनी सांगितले आहे. गर्ग यांना भारतीय कबड्डी महासंघावर न्यायालयाने नियुक्त केले आहे.

मार्चमध्ये जयपूरला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होत्या. नेमके त्याच वेळेस राजस्थानमध्ये कोरोनाचा रुग्ण वाढत होते. त्यामुळे काळजी करण्यासारखी स्थिती होती. 'प्रो कबड्डी'ची प्राथमिक चर्चा राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी  सुरू होती. मात्र, मार्चपासून सर्वच खेळांच्या स्पर्धा स्थगित झाल्या. नंतर लाॅकडाऊनही आला. आता काही दिवसांपासून काही खेळांचा सराव सुरू झाला आहे; मात्र कबड्डीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. 

"कबड्डी हा कमालीचा शारीरिक संपर्काचा खेळ आहे तो खेळताना मास्क वापरणे अशक्‍य आहे; तसेच सुरक्षित अंतर राखणेही अशक्‍य आहे. त्यामुळे या खेळाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे करून काही साधणार नाही. त्यामुळे ती तयार केलेलीच नाहीत. क्रीडा मंत्रालयाबरोबर आमची बैठक झाली होती." असे गर्ग यांनी सांगितले.

परिस्थिती सुधारल्यावर होणार विचार

कुस्ती, बॉक्‍सिंग हे शारीरिक संपर्क असलेले खेळ आहेत. हे खेळ सुरु करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तर सुमो कुस्तीला जपानमध्ये सुरुवातही करण्यात आली आहे, याकडे कबड्डीप्रेमी लक्ष वेधून कबड्डी सुरु करण्याची मागणी करतात. मात्र, कबड्डी महासंघावरील निरीक्षकांना हे मान्य नाही. "कबड्डी खेळ सुरू करण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत; पण त्यातील धोकाही लक्षात घ्यायला हवा. नजीकच्या कालावधीत कोणतीही आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा नाही. त्यामुळे तातडीने शिबिर घेण्याची किंवा स्पर्धा घेण्याची गरज नाही. आपण समजा खेळ सुरू केला आणि कोणाला दुर्दैवाने कोरोना झाला, तर खेळाची प्रगती होणार नाही. उलट त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. परिस्थिती सुधारल्यास खेळ सुरु करण्याबाबत नक्कीच विचार करता येईल," असे गर्ग यांनी सांगितले आहे. 

कबड्डीचा खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी आम्हीही पावले उचलत आहोत. नवोदित खेळाडू, मार्गदर्शक, तांत्रिक पदाधिकारी यांना मार्गदर्शन कसे करावे, याबद्दल आमचा विचार सुरु आहे. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरू केले जाईल. आम्ही क्रीडामंत्र्यांना हे सांगितले आहे. त्यासाठी संलग्न राज्य संघटनांबरोबर लवकरच चर्चा होऊन त्यांचीही मते जाणून घेतली जातील. त्यानंतर योजना तयार होईल, अशीही माहिती त्यांनी दिली. 

प्रो कबड्डीचा विचार नंतरच

मुंबई, दिल्ली, पुण्यासारख्या शहरात कोरोनाचे आक्रमण वाढत आहे. रुग्णांची संख्याही वाढते आहे. या परिस्थितीत 'प्रो कबड्डी' चा विचार करणे अवघड आहे. एकदा कोरोनाचा संसर्ग कमी झाली की त्याबाबत विचार करता येईल, असे गर्ग यांनी सांगितले. प्रो कबड्डी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये घेण्याबाबत सुरू असल्याची चर्चा आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले, ''त्यासाठी कोरोनाची साथ आटोक्‍यात येण्याची आवश्‍यकता आहे. खेळाडूंचे आरोग्य पणास लावून कोणतीही स्पर्धा सुरू करण्यास परवानगी द्यायला क्रीडा मंत्रालय तयार नाही.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख