दाऊदचा विश्‍वासू इक्‍बाल मिर्चीच्या ५०० कोटींच्या तीन इमारती ताब्यात - Iqbal Mirichi properties forfeited | Politics Marathi News - Sarkarnama

दाऊदचा विश्‍वासू इक्‍बाल मिर्चीच्या ५०० कोटींच्या तीन इमारती ताब्यात

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

मिर्ची व त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित ८०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर वर्षभरात टाच आणण्यात आली होती. सक्तवसुली संचलनालयाकडे (ईडी) दाखल गुन्ह्यांत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत या मालमत्तांचा ताबा तस्कर आणि परकीय चलन हाताळणी विभागाने (सफेमा) घेतला आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्‍वासू इक्‍बाल मिर्चीच्या वरळी येथील राबिया मेन्शन, मरियम लॉज व सीव्ह्यू या तीन इमारती केंद्रीय यंत्रणांनी ताब्यात घेतल्या आहेत. अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ अंतर्गत ९ नोव्हेंबरला आदेश जारी करण्यात आले होते. त्याअंतर्गत या तीन मालमत्तांबाबत झालेले सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेली मालमत्तांची किंमत ५०० कोटींहून अधिक आहे. 

यापूर्वीच मिर्ची व त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित ८०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर वर्षभरात टाच आणण्यात आली होती. सक्तवसुली संचलनालयाकडे (ईडी) दाखल गुन्ह्यांत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत या मालमत्तांचा ताबा तस्कर आणि परकीय चलन हाताळणी विभागाने (सफेमा) घेतला आहे. या इमारतीवर एका ट्रस्टने २००५ मध्ये दावा केला होता. मिर्चीने या मालमत्तांचे पूर्ण पैसे भरले नसल्यामुळे त्यांचा ताबा मिर्चीला देण्यात आला नव्हता, असा दावा ट्रस्टकडून करण्यात आला होता. 

६ नोव्हेंबर २०१९  रोजी ईडीने याप्रकरणी सखोल तपास करून या मालमत्ता इक्‍बाल मिर्चीच्याच असल्याचे पुरावे सादर केले होते. आर्थिक गैरव्यवहार कायद्याअंतर्गत (पीएमएलए) राबवण्यात आलेल्या शोध मोहिमांमार्फत हे पुरावे गोळा करण्यात आले होते. त्यात संपूर्ण रक्कम भरल्याच्या पावत्या, पासबुकमधील व्यवहार, इक्‍बाल मेमन उर्फ मिर्चीला मालमत्तांचा ताबा हस्तांतरण पत्र, आयकर विभागाकडे मालमत्तेच्या विक्रीबाबत भरण्यात आलेल्या कर आदी महत्त्वपूर्ण पुरावे ईडीच्या हाती लागले होते. त्याच्या आधावर ट्रस्ट करत असलेला दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले होते.

८०० कोटींच्या मालमत्तांवर टाच
भारतात गुन्हेगारीतून कमावलेल्या पैशांतून इक्‍बाल मिर्ची व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर लंडनमध्ये २५  मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील १६  मालमत्ता हाजरा मेमन हिच्या नावावर आहेत. याशिवाय युकेमध्ये चार कंपन्यांच्या नावावर सहा मालमत्ता आहेत. याशिवाय यूएईतील मिहाय इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपनीच्या नावावरही लंडनमेध्य तीन मालमत्ता आहेत. याशिवाय सांताक्रूझ येथील उच्चभ्रू जुहू तारा रोडवरही त्याचे दोन दोन फ्लॅट आहेत. त्यांचा लिलाव १० नोव्हेंबरला करण्यात आला. मात्र या मालमत्तेसाठी कोणीही बोली लावली नाही. मिर्चीची पत्नी हाजरा मेमन, दोन मुले आसीफ व जुनैद यांच्यासह १३ जणांवर ईडीने डिसेंबर २०१९  मध्ये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, मिर्चीच्या सुमारे ८०० कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख