तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? - प्रवीण दरेकर - If you haven't done anything, why be afraid to inquire? - Praveen Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? - प्रवीण दरेकर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

मलिक यांनी केलेल्या आरोपांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

मुंबई : राज्यातील मंत्र्यांवर सध्या सीबीआय, ईडी आदी केंद्रीय संस्थांकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी तर ईडी 12 मंत्र्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड हे या लिस्टमध्ये 12 वे खेळाडू असल्याचे भाकीत सोमय्या यांनी केले होते.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. मलिक यांनी केलेल्या आरोपांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

हेही वाचा...

स्वयंघोषित कोकण सम्राट कोकणातच चीत - उद्योगमंत्री सुभाष देसाई

प्रवीण दरेकर म्हणाले, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्‍यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जातेय, हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चोर्‍या-आता बहाणे’ असा प्रकार आहे. 

स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मीडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. 

आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चोर्‍या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा...

ओबीसी आरक्षणाबाबत निश्चित योग्य मार्ग निघेल - अजित पवार

असेच प्रकार बेळगावमधील भाजपच्या विजयानंतर काही नेते करीत आहेत. मराठी माणसाचा पराभव वगैरे बिरूद ते लावतील. पण, भाजपच्या विजयी 36 नगरसेवकांपैकी 23 मराठी आहेत, हे तुम्हाला कधीही सांगणार नाहीत. निव्वळ भावनात्मक विषय करून सामान्य जनतेची फसवणूक तुम्ही करू शकत नाही. निवडणूक निकालावर शंका उपस्थित करून शिवसेना आता काँग्रेसच्या अधिक जवळ गेली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

Edited By - Amit Awari

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख