I am Anand Dighe of Uddhav Thackeray : Milind Narvekar | Sarkarnama

मी उद्धवसाहेबांचा आनंद दिघे ! 

गणेश कोरे 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मी आनंद दिघे यांचा अनुयायी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सावली असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर दिली आहे.

पुणे : मी आनंद दिघे यांचा अनुयायी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सावली असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर दिली आहे.

ज्या प्रमाणे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे ऋणानुबंध होते, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नार्वेकर समजले जातात. त्यातून नार्वेकर यांनी अप्रत्यक्षरित्या आपण उद्धव ठाकरे यांचे आनंद दिघे आहोत, असे सूचित केले आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मातोश्री निवास स्थानातून ऑनलाइन मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान नार्वेकर हे मुलाखत सुरु असलेल्या हॉलमध्ये भिंतीला टेकून निवांत बसलेले छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. या छायाचित्राबाबत ट्विटरवर प्रतिक्रिया देताना मिलिंद नार्वेकर यांनी "आय एम फॉलोईंग आनंद दिघे साहेब' असे म्हटलेले आहे. 

(स्व.) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि (स्व.) आनंद दिघे यांचे ऋणानुबंध हे सर्वश्रुत आहेत. ठाणे शहरात दिघे यांना प्रति शिवसेनाप्रमुख म्हणून संबोधले जात होते. शिवसेनाप्रमुखांवरील निष्ठा कशी असावी, तर ती आनंद दिघे यांच्यासारखी असावी, अशी शिवसैनिकांमध्ये तेव्हा चर्चा असायची. शिवसेनाप्रमुखांचा कोणताही शब्द दिघे यांनी खाली पडू दिला नाही. शिवसेनेची विविध प्रखर आंदोलने दिघे यांनी यशस्वी करुन दाखविली होती. त्यामुळे दिघे यांना शिवसेनेत विशेष मान सन्मान आणि प्रतिष्ठा होती. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यानंतर पुढच्या पिढीकडे शिवसेनेची सुत्रे आली आहेत. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे कार्यरत आहेत. (स्व.) आनंद दिघे यांच्या प्रमाणे मिलींद नार्वेकर हे ठाकरे यांच्या जवळ आहेत. नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सावली समजले जातात. तसेच, मुख्यमंत्र्यांचे विशेष दूत म्हणून विशेष जबाबदारी पार पाडत आहेत.

दूत म्हणून कामगिरी करत असताना, महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधाची आमंत्रणे दिल्ली दरबारी देण्यासाठी नार्वेकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती, तर दिल्लीहून आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य देखील नार्वेकर यांनी केले होते. 

अशा प्रकारे पक्षप्रमुख ठाकरे यांची सावली असलेले नार्वेकर यांनी आपण आनंद दिघे यांचे अनुयायी असल्याचे सांगत, उद्धव ठाकरेंचे आनंद दिघे असल्याचे संबोधले आहे. 

तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी म्हणजे भाग्यच 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्विटमध्ये नार्वेकर म्हणतात, ""गेल्या 26 वर्षांपासून मी ज्या व्यक्तीसाठी काम करतोय, त्यांचा आज वाढदिवस! शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री हा तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. तुमच्या शांत व संयमी नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली, यातच मी माझे भाग्य समजतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा साहेब.'' 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख