कलामांना आदरांजली वाहताना अनिल देशमुखांचा कोशियारीना टोला

राज्यपाल कोशियारी यांनी मंदीरे सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाद ओढवून घेतला आहे. विशेषतः धर्मनिरपेक्षतेवरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे, त्यात आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यपालांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे
Bhagatsinh Koshiyare - Anil Deshmukh
Bhagatsinh Koshiyare - Anil Deshmukh

मुंबई : "थोर माणसं धर्माचा उपयोग मित्र वाढवण्यासाठी करतात. खुजी माणसं धर्माचा वापर करुन संघर्ष घडवू  पाहतात," हा विचार देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 'राष्ट्रपती' या घटनात्मक पदाची उंची आपल्या सर्वसमावेशक वर्तनातून वाढवली. राष्ट्रपती, राज्यपाल ही संविधानिक पदे कोण्या धर्माशी, प्रांताशी किंवा एखाद्या पक्षाशी तर अजिबातच बांधील नसतात याचे भान सदैव ठेवल्याने कलाम हे देशाच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपतींपैकी एक ठरले. त्यांना माझी विनम्र आदरांजली," या शब्दात भावा व्यक्त करत असतानाच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. 

माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या ८९ व्या जयंतीनिमीत्त देशमुख बोलत होते. या निमित्ताने त्यांनी राज्यपालांवर शरसंधान करण्याची संधी साधली. राज्यपाल कोशियारी यांनी मंदीरे सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाद ओढवून घेतला आहे. विशेषतः धर्मनिरपेक्षतेवरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. 

राज्यघटनेने बहाल केलेल्या पदाची प्रतिष्ठा कशी वाढवावी, सर्वोच्च पदावरील व्यक्तीने धर्मातीत आचरणातून राज्यघटनेला अपेक्षित सेक्युलर धर्माचे पालन कसे करावे, याचा आदर्शच डॉ. कलाम यांनी घालून दिला. सर्वोच्च पदांवरील व्यक्तींच्या मूल्यांची वेगाने घसरण होत असल्याच्या आजच्या काळात डॉ. कलाम यांचा आदर्श सर्वांसाठी अनुकरणीय असल्याचे सांगत आता अनिल देशमखांनीही कोशियारी यांच्यावर शरसंधान केले आहे. 

डॉ. कलाम यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना देशमुख यांनी पुढे सांगितले, "मुळात ज्येष्ठ वैज्ञानिक असलेल्या डॉ. कलाम यांनी स्वतःच्या अराजकीय आणि कमालीच्या तटस्थ वर्तनातून राष्ट्रपतीपदाची उंची वाढवण्याचे काम केले. राज्य, प्रांत, राजकीय विचार असे सर्व भेद त्यांच्याजवळ गळून जात. संपूर्ण देशवासीयांची मने त्यांनी त्यांच्या निर्व्याज आणि सर्वसमावेशक वागण्यातून जिंकली. वयाने वृद्ध असूनही मनाने ते नेहमीच तरुण राहिले. भेदभावाचा स्पर्श त्यांनी स्वतःच्या निर्णयप्रक्रियेला होऊ दिला नाही." आजच्या गढूळलेल्या वातावरणात डॉ. कलाम यांची आठवण स्वाभाविकपणे सदोदित होते, असे देशमुख म्हणाले.

"राष्ट्रपती पदावर असताना तसेच निवृत्तीनंतरही डॉ. कलाम यांनी युवकांमध्ये देशप्रेम आणि वैज्ञानिक वृत्ती जागवण्यासाठी सतत प्रयत्न केले. देशातल्या तरुणाईवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. समर्थ आणि कार्यक्षम भारताचं स्वप्न त्यांनी बघितलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी ते अखेरपर्यंत मोलाचे योगदान देत राहिले. विविध कल्पक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना प्रेरीत केले होते," असे देशमुख म्हणाले.

भारताचे 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेल्या डॉ. कलाम यांनी भारतीय संरक्षण दलाला आत्मनिर्भर करण्यासाठी मोठे योगदान दिले. भारताला संरक्षणसिद्ध करण्यासाठी राबविण्यात आलेल्या क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम त्यांच्याच नेतृत्वाखाली राबविण्यात आला. आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आणि उड्डाणवाहकांची निर्मिती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. डॉ. कलाम हे सर्वार्थाने ‘भारतरत्न’ होते. त्यांनी २१ व्या शतकातील समर्थ भारताचे स्वप्न पाहिले होते, असे देशमुख यांनी सांगितले. 

''विंग्ज ऑफ फायर' हे त्यांचे आत्मचरित्र अत्यंत प्रेरणादायी आहे. 'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम, एनव्हिजनिंगन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन, सायंटिस्ट टू प्रेसिडेंट, टर्निंग पॉइंट्स, टार्गेट ३ मिलियन, ट्रान्सेन्डन्स, दीपस्तंभ यासारख्या पुस्तकातून नव्या भारताचा विचार डॉ. कलाम यांनी मांडला. या थोर वैज्ञानिक, राष्ट्रपतींच्या आदर्शांचे आचरण करण्यातच आपल्या सर्वांचे हित आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते," असे देशमुख यांनी नमूद केले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com