शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला मंत्री केलंय का? राणेंनी दिले हे उत्तर... - Have you been made a minister to oppose Shiv Sena? The answer given by Rane ... | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला मंत्री केलंय का? राणेंनी दिले हे उत्तर...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

या मंत्रिपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचे काम करेन.

मुंबई : शिवसेनेला शह देण्यासाठी मला मंत्री केलंय की कशासाठी केलंय, याचे कारण तर मला माहिती नाही. पण, मला मंत्री केलंय एवढं नक्की. आताच शपथ घेऊन आलोय. पण, भारतीय जनता पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करेन. माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे नारायण राणे यांनी सांगितले. (Have you been made a minister to oppose Shiv Sena? The answer given by Rane ...)

केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिले आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राणे यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की, मी आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ते देतील ती जबाबदारी सांभाळेन. या मंत्रिपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचे काम करेन.

हेही वाचा : काँग्रेसला १२ वर्षांत राणेंची ताकद समजली नाही, ती भाजपने दीड वर्षातच ओळखली

राजकीय वर्षाबद्दल बोलताना राणे यांनी सांगितले की एवढ्या वर्षांचा प्रवास दोन वाक्यांत सांगणे  शक्य नाही. पण, प्रथम मी १९८५ मध्ये मुंबई महापलिकेत नगरसेवक  झालो, त्यानंतर बेस्टचा चेअरमन झालो. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, खासदार आणि आता केंद्रीय नेत्याची शपथ आज घेतली आहे. याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मी ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मी आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊ शकलो.

मंत्रिमंडळातील कमबॅकबाबत राणे म्हणाले की, मी १९९९ मध्ये मुख्यमंत्री झालो. त्यानंतर असे अनेक राजकीय चढ-उतार आले. पण, मोदींच्या सहकार्यामुळे मला हे मंत्रीपद मिळाले आहे. त्यांनी टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत पक्ष जो जबाबदारी देईल, ती समर्थपणे निभावण्याचा आणि माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. 

राज्यातील महाविकास  आघाडी  मराठा आरक्षण  न मिळण्यास जबाबदार आहे. घटनेचा आणि कायद्याचा अभ्यास नसल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलत आहेत, असा आरोपही राणे यांनी यावेळी बोलताना केला. पण, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राज्यात आगामी काळात भाजप सत्तेवर येणार का, यावर राणे यांनी सर्व गोष्टी आज कशाला विचारताय. आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याबाबत विचारा, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री असल्यामुळे प्रोटोकॉलनुसार मी आज प्रथम शपथ घेतली, एवढंच त्यामागचं कारण आहे, असल्याचे राणे यांनी नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख