संकटात भर; शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद, सेवा विस्कळीत होणार - Government medical officers on strike tomorrow in maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

संकटात भर; शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे उद्या कामबंद, सेवा विस्कळीत होणार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 18 रुग्णालये आहेत.

पुणे : राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना त्यात दिवसेंदिवस अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये सोयीसुविधांसह मनुष्यबळही अपुरे पडत आहे. त्यातच आता राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे या संकटात आणखी भर पडणार आहे. 

राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 18 रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये 350 ते 400 वैद्यकीय अधिकारी आहेत. वैद्यकीय अधिक्षक, आपत्कालीन विभाग, बाह्यरूग्ण विभाग, निवासी वैद्यकीय अधिकारी अशा विविध पदांवर हे अधिकारी काम करत आहेत. यातील बहुतेक अधिकारी शासनाच्या पूर्णवेळ सेवेत नाहीत. त्यांना वेतन आयोगाचाही लाभ मिळत नाही. त्यामुळे सेवेत सामावून घेण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

मागील वर्षी या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याअंतर्गत उद्या 24 तास कामबंद आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॅा. आनंद बरगाले यांनी दिली. 

वैद्यकीय सेवांवर परिणाम होण्याची भिती

राज्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा भार आहे. बहुतेक रुग्णालये रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. रुग्णांना बेड मिळत नाही. मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहेत. त्यातच वैद्यकीय अधिकारी काम बंद ठेवणार असल्याने वैद्यकीय सेवांवर ताण पडण्याची शक्यता आहे. सेवा विस्कळीत झाल्यास रुग्णांचे हाल होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

बेमुदत काम बंदचा इशारा

मागील दहा वर्षांपासून मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहोत. पण आजपर्यंत केवळ हेळसांड झाली आहे. त्यामुळे कोणतीही ठोस कायर्वाही न झाल्यास ता. 22 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलनावर जावे लागेल, अशा इशारा बरगाले यांनी दिला आहे. रुग्ण किंवा प्रशासनाला वेठीस धरायचे नसून आमच्या मागण्यांसाठी नाईलाजास्तव, अतिशय नैराश्यतेने हे पाऊल उचलण्यापलीकडे आमच्याकडे कुठलाही पर्याय नसल्याचेही बरगाले यांनी सांगितले.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख