Folk Artist faced Difficulty due to Lockdown | Sarkarnama

पोट भरणारे घुंगरू झाले अबोल ! 

हितेंद्र गद्रे 
शुक्रवार, 22 मे 2020

लावणी ही महाराष्ट्राची लोककला. या कलेवर पोट भरणारे राज्यातील सुमारे साडेदहा ते अकरा हजार कलावंत सध्या लॉकडाउनमुळे उपासमारीचा सामना करत आहेत.

यवत ः लावणी ही महाराष्ट्राची लोककला. या कलेवर पोट भरणारे राज्यातील सुमारे साडेदहा ते अकरा हजार कलावंत सध्या लॉकडाउनमुळे उपासमारीचा सामना करत आहेत. सरकार आमच्यासाठी काही तरी करेल या आशेवर सध्या बहुतांश कलावंत आहेत.

सध्या सरकार कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, मायबाप सरकारने आमचाही विचार करावा, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. 

कला रसिकांकडून मिळणाऱ्या पैशांवर तमाशा कलावंतांचे पोट अवलंबून असते. मात्र, मागील दोन ते अडीच महिन्यांपासून कला केंद्र बंद आहेत. सुमार शिक्षण, इतर कामांचा अनुभव नाही. त्यातच समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी काम मिळणेही कठीण होऊन बसले आहे. सध्या सरकारकडून व विविध संस्था, देणगीदार यांच्याकडून मिळाणाऱ्या मदतीवर हे लोक आपापल्या गावी कसाबसा तग धरून आहेत. 

दुसरीकडे तमाशा फडांची अवस्थाही काही वेगळी नाही. तमाशाचे फड सुरू करण्याच्या काळातच देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. यात्रांच्या या काळात कार्यक्रम बंद झाल्याने उत्पन्न बुडाले. या तीन-चार महिन्यांच्या काळात मिळणाऱ्या उत्पन्नावर हे लोक वर्षभर गुजराण करत असतात. या कलावंतांची अवस्थाही आता बिकट झाली आहे. या सर्वांनाच आता सरकारकडून आर्थिक मिळावा, असे वाटत आहे. 

 

राज्यातील कला केंद्रे व कलावंतांची संख्या

राज्यातील कला केंद्रे सुमारे 65 ते 70
तमाशा थिएटरमधील कलाकार  सुमारे 6 ते 7 हजार
राज्यात मोठे तमाशा फड   सुमारे 13
राज्यातील लहान फड  सुमारे 150
राज्यातील एकूण कलावंत  साडेदहा ते अकरा हजार

 

आम्ही सरकारकडे अनेकदा निवेदन केले आहे. मदतीची मागणी केली आहे. खासदार अमोल कोल्हे याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही मदत करण्याचे मान्य केले आहे. कोल्हे यांनी आमची कैफियत केंद्र आणि राज्य सरकारकडे मांडली आहे. त्यांचे मी सर्व कलावंतांच्या वतीने आभार मानतो. सरकार नक्कीच काही तरी करेल, अशी अपेक्षा आहे. 
- रघुवीर खेडकर, तमाशा फड मालक 

आमच्या अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे एका सामाजिक संस्थेकडून अनेक कलावंतांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची मदत मिळाली आहे. मात्र कलावंतांची संख्या मोठी आहे. पवार साहेब, खासदार डॉ. अमोल कोल्हे कलावंतांसाठी सहानुभूतीने विचार करत आहेत. त्यामुळे सरकार दरबारी कलावंतांचा विचार होईल, अशी खात्री वाटते. 
- डॉ. अशोक जाधव, 
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर चालक-मालक संघटना 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख