शेतकरी नेते अजित नवलेंना गोळ्या घालण्याची धमकी - Farmer leader Ajit Navale threatened to shoot | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी नेते अजित नवलेंना गोळ्या घालण्याची धमकी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत नवले यांनीच आपल्या फेसबुक अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

पुणे : किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत नवले यांनीच आपल्या फेसबुक अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. यासंदर्भात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता फेसबुकवरून संवाद साधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. नवले यांच्याकडून सातत्याने केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात भूमिका मांडली जात आहे. या कायद्यांविरोधात मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चाच्या आयोजनातही त्यांचा सहभाग होता. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेला हिसांचार सरकारने घडवून आणल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यामुळेच त्यांना फेसबुकवरून धमकी देण्यात आल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, नवले हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्यही आहेत. पक्षाचे राज्य सचिव व माजी आमदार नरसय्या आडम यांनी याप्रकणात अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप केले आहेत. ते म्हणाले, ''डॉ. अजित नवले यांना 'नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन' या शब्दांत एका व्यक्तीने काल फेसबुकवर पोस्ट टाकली आणि इतर दोघांनी ती लाईक केली. या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळाले.

देशभर सध्या भाजपच्या केंद्र सरकारविरुद्ध सुरू असलेल्या अभूतपूर्व देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या आणि हे आंदोलन दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आली आहे, हे सूचक आहे. उद्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांचा हौतात्म्य दिन आहे. त्यांचा खून करणाऱ्या शक्तीच आज अशा धमक्या देत सुटल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टीका आडम यांनी केली आहे.

नवले यांना देण्यात आलेल्या या धमकीचा जळजळीत निषेध करत आहे आणि महाराष्ट्रातील सर्व देशप्रेमी आणि लोकशाही जनतेला या घटनेचा तीव्र निषेध करण्याचे आवाहन करत आहे. फेसबुकवरून अशा धमक्या देणाऱ्या व त्या लाईक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ताबडतोब कायदेशीर कारवाई सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख