मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गटबाजी - Factionalism Erupted in BMC Within Nationalist Congress Party | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गटबाजी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी नगरसेवक कप्तान मलिक यांची सुधार समिती सदस्यपदी नियुक्ती करण्याचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले होते; मात्र पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी कप्तान मलिक यांच्या जागी मनीषा रहाटे यांची नियुक्ती करण्याचे पत्र महापौरांना दिले. महापालिकेच्या नियमानुसार गटनेत्यांच्या पत्राच्या आधारे काल मनीषा रहाटे यांची नियुक्ती महासभेत जाहीर करण्यात आली.

मुंबई  : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटबाजी मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच उघड झाली आहे. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्य पदावरून त्यांच्यातील अंतर्गत वाद अधोरेखित झाला आहे.

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी नगरसेवक कप्तान मलिक यांची सुधार समिती सदस्यपदी नियुक्ती करण्याचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले होते; मात्र पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी कप्तान मलिक यांच्या जागी मनीषा रहाटे यांची नियुक्ती करण्याचे पत्र महापौरांना दिले. महापालिकेच्या नियमानुसार गटनेत्यांच्या पत्राच्या आधारे काल मनीषा रहाटे यांची नियुक्ती महासभेत जाहीर करण्यात आली.

कप्तान मलिक हे नवाब मलिक यांचे बंधू आहेत. ते त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच वादग्रस्त ठरतात. तसेच राखी जाधव आणि कप्तान मलिक यांचे फारसे पटतही नाही. असे असले, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह कधीच उघड झाले नव्हते; मात्र या नियुक्तीच्या निमित्ताने हे वाद चव्हाट्यावर आले आहेत. याबाबत राखी जाधव यांच्याशी संपर्क झाला नाही. गटनेत्यांनी मुंबई अध्यक्षांची सूचना डावलून मनमानी पद्धतीने ही नियुक्ती केली आहे. याबाबत पक्षाकडे तक्रार करू, असे कप्तान मलिक यांनी सांगितले; तर राखी जाधव यांनी सांगितले, की अशा नियुक्तीची शिफारस करण्यात आली नव्हती.

पुढील महिन्यात अध्यक्षांची निवड
महापालिकेतील विषय समित्यांच्या सदस्यपदी नवीन नियुक्‍त्या मार्चमध्ये करण्यात येतात; मात्र यंदा कोरोनामुळे पाच महिने विलंबाने या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. महासभेत आज या सर्वपक्षीय सदस्यांच्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या; तर पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.

स्वीकृत नगरसेवक पहिल्यांदाच स्थायी समितीत
महापालिकेच्या वैधानिक समित्यांवर नव्या सदस्यांची नियुक्ती आज महासभेत जाहीर करण्यात आली. स्थायी समितीवर भाजपकडून भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली. शिरसाट हे स्वीकृत सदस्य आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारे स्वीकृत सदस्याची स्थायी समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. शिरसाट हे अभ्यासू असून त्यांनी गटनेते म्हणूनही काम पाहिले आहे. स्थायी समितीत शिवसेनेला घेरण्यासाठी शिरसाट यांच्याबरोबर उज्ज्वला मोडक या ज्येष्ठ नगरसेविकेचीही भाजपने नियुक्ती केली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेच्या कोअर समितीचे सदस्य राहुल कनाल यांना शिक्षण समितीत पुन्हा संधी देण्यात आली आहे. कनाल यांची शिक्षण समितीच्या स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेकडून फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख