Eknath Khadse with Family joined from Jalgaon in Agitation against Government | Sarkarnama

नाराज एकनाथ खडसे भाजपच्या आंदोलनात सहभागी! 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 22 मे 2020

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आज पक्षाच्या "मेरा अंगण, मेरा रणागंण' या आंदोलनात सहभागी झाले. या वेळी खासदार रक्षा खडसे याही उपस्थित होत्या. 

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आज पक्षाच्या "मेरा अंगण, मेरा रणागंण' या आंदोलनात सहभागी झाले. मुक्ताई नगर (जि. जळगाव) येथील आपल्या निवासस्थानी या आंदोलनात सहभाग घेऊन राज्यातील सरकारविरोधात त्यांनी घोषणा दिल्या. या वेळी खासदार रक्षा खडसे याही उपस्थित होत्या. 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. "मेरा आंगण, मेरा रणागंण'च्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज होते. त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्तही केली होती, त्यामुळे ते या आंदोलनात सहभागी होणार की नाही, याकडे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. 

मुक्ताई नगरातील कोथळी येथील आपल्या निवास्थानी एकनाथ खडसे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. घरासमोर अंगणात राज्य सरकारच्या विरोधात फलक घेऊन ते उभे राहिले होते. या वेळी खासदार रक्षा खडसेही त्यांच्या सोबत होत्या.

"उद्धवा अजब तुझे, निष्फळ सरकार, "महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, पण उद्धव मात्र घरात', "कोरोना रोखण्यास असमर्थ ठरलेल्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो' "कोरोना'चं संकट होतंय गडद, महाराष्ट्र सरकार वाऱ्यावर अशा घोषणाही त्यांनी दिल्या. या वेळी उपस्थित सर्वांच्या हातात राज्य सरकारच्या निषेधाचे फलकही होते. 

या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, नारायण चौधरी, योगेश कोलते, उमेश राणे, संदीप देशमुख, आसिफ बागवान व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. एकनाथ खडसे यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन आपण पक्षावर टीका करीत असलो तरी पक्षाशी एकनिष्ठ आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

या पूर्वीही विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिकिट कापण्यात आल्यानंतर त्यांनी भाजप आणि पक्षाचे राज्यातील पदाधिकारी तसेच इतर नेतेमंडळींवर जोरदार टीका केली होती. 

संघटनात्मक पद मिळण्याची चर्चा 

एकनाथ खडसे यांची पक्षावर असलेली नाराजी दूर करण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील टीमध्ये महत्वाचे संघटनात्मक पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सोबतच्या टीममध्ये ते राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख