शरद पवार पंतप्रधान व्हावेत हे स्वप्न नक्की साकार होईल : खासदार अमोल कोल्हे - Dream of Sharad Pawar becoming Prime Minister will come true says MP Amol Kolhe | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार पंतप्रधान व्हावेत हे स्वप्न नक्की साकार होईल : खासदार अमोल कोल्हे

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

शाश्वत विकासाचे मॉडेल असलेल्या शरद पवारसाहेबांकडे देश आशेने बघतोय. पवार साहेब पंतप्रधान व्हावेत हे आमचे स्वप्न असून ते नक्की साकार होईल, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे. त्यामुळे देशातील जनतेला शाश्वत विकासाची आस आहे. त्यामुळे शाश्वत विकासाचे मॉडेल असलेल्या शरद पवारसाहेबांकडे देश आशेने बघतोय. पवार साहेब पंतप्रधान व्हावेत हे आमचे स्वप्न असून ते नक्की साकार होईल, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुमचा तुमच्या स्वप्नावर विश्वास असेल तर ते नक्की साकार होते. शरद पवार साहेब पंतप्रधान व्हावेत, हे आमचे स्वप्न आहे. आमच्या स्वप्नावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ही केवळ माझीच इच्छा नाही तर प्रत्येक मराठी माणसाची आहे. पवार साहेब पंतप्रधान झाले तर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल. प्रत्येकाने मनावर घेतले तर हे स्वप्न नक्की साकार होईल. 

मोदी सरकारने देशातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. महागाईमध्ये 72 टक्क्यांची वाढ झाली आहे. 'अब की बार...' अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारच्या काळातील ही वाढ झाली आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण देशातील बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. रेल्वेच्या 63 हजार जागांसाठी लाखो अर्ज आले होते. महागाई, बेरोजगारी आणि तीच परिस्थती अर्थव्यवस्थेची आहे.

हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्रातील 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार

अर्थव्यवस्था सातत्याने गाळात चालली आहे. आत्मनिर्भर भारत ही घोषणा मुठभर भांडवलदारांच्याच फायद्याची आहे. आता शाश्वत विकासाची आस जनतेला आहे. या शाश्वत विकासाचे मॉडेल म्हणजे पवारसाहेब आहेत. देश पवारसाहेबांकडे आशेने बघतोय, असे कोल्हे यांनी सांगितले.

दिल्लीच्या निवडणूकीची तयारी सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमातून त्याची प्रचिती आली. खासदार अमोल कोल्हे यांनीही याबाबत सुचक वक्तव्य केले. ते म्हणाले, प्रत्येक पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकही तयार प्रयत्न करत आहेत. आम्ही नक्कीच दिल्लीतही पक्षाचा विस्तार करू.

सेलिब्रिटींनी आधीही ट्विट करायला हवे होते

पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन दिल्यानंतर देशातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना विरोध करणारे ट्विट केले. बहुतेक ट्विटमधील मजकूर एकसारखा असल्याने त्याची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविषयी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, तथाकथित सेलिब्रिटींनी जर आधी काही ट्विट केले असते तर बरे झाले असते, अशी लोकांची भावना होती. एक कॉमन हॅशटॅग वापरला, त्याची चौकशी आहे. व्यक्त होणे प्रत्येकाचा अधिकार आहे. पण आपण कोणत्या बाबीवर कसे व्यक्त होतो, याचा विचार केला तर वाद होत नाहीत, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख