Devendra Fadnavis says to Aditya Thackeray, 'He is new!' | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना म्हणतात, 'नया है वह!' 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 12 जुलै 2020

राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युवा सेनेचे प्रमुख तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची 'नया है वह!' अशा शब्दांत खिल्ली उडविली आहे. 

पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युवा सेनेचे प्रमुख तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची 'नया है वह!' अशा शब्दांत खिल्ली उडविली आहे. 

फडणवीस हे मुंबईत रविवारी (ता. 12 जुलै) पत्रकारांशी बोलत होते. "तुम्ही राज्यात फिरून कोरोनाची वस्तुस्थिती जाणून घेऊन ती जनतेसमोर मांडता. पण, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तुमच्या या दौऱ्याला 'डिजास्टर टुरिझम'  असे संबोधतात,' असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता.

पत्रकारांच्या त्या प्रश्‍नाला फडणवीस यांनी हसून उत्तर दिले. ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात, त्यांना मंत्री बनवता येतं. पण, मंत्री बनविल्यानंतर शहाणपण येतंच असं नाही ना? त्यामुळे ठीक आहे. ते नवीन आहेत, बोलताहेत. मला असं वाटतं की माझ्यासारख्या माणसानं त्यावर फार काय प्रतिक्रिया देऊ नये. 

 

शरद पवारांची मुलाखत म्हणजे 'नुरा कुस्ती'  : फडणवीस

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गेल्या दोन दिवसांपासून "सामना'तून मुलाखत प्रसिद्ध होत आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्‍सिंग, नुरा कुस्ती असल्याची टीका केली आहे. 

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही टीका केली आहे. पत्रकारांकडून फडणवीस यांना "भाजपला सत्तेचा दर्प चढला होता. बाळासाहेबांची शैली भाजपशी सुसंगत नव्हती. मागील सरकार हे युतीचे नव्हते, तर फक्त भाजपचे होते,' असा आरोप शरद पवार यांनी केला आहे, असा प्रश्‍न विचारण्यात आला. 

त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, तुम्ही डब्ल्यूडब्ल्यूएफची कुस्ती बघितली आहे का? तसेच, पूर्वीच्या काळी नुरा कुस्ती व्हायची. त्याला मॅच फिक्‍सिंग असे म्हणतात. तसं हे मॅच फिक्‍सिंग चाललं आहे, ते आणखी एक दिवस चालणार आहे. ते मॅच फिक्‍सिंग एकदा संपू द्या. त्यावर मी योग्य वेळी उत्तर देणार आहे. 

कोरोनाविरोधात लढाई सुरू असताना विरोधी पक्षाकडून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, या आरोपालाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

त्याबाबत ते म्हणाले की, स्वतःच मारून घ्यायचं आणि स्वतःच रडायचं, अशी एक पद्धत आहे. कारण, ती पद्धत अवलंबली तर आपल्या अपयशापासून जनेतची नजर बाजूला होते. त्यातलाच हा प्रकार आहे. कोणीही सरकार पाडत नाही. आपणच कांगावा करायचा, सरकार पाडले जात आहे, सरकार पाडले जात आहे. त्याच्यावरच मुलाखती करायच्या, त्यावरच बोलयाचं. जेणेकरून खरी कोरोनाविरोधातील लढाई, प्रश्‍न आहेत, त्याकडे जनतेचे दुर्लक्ष होईल. पण, मला असं वाटतंय की त्यांनी कोरोनाविरोधातील लढाईकडे लक्ष दिलं पाहिजं. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख