मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देणारा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या भाषणांतील काही सुचक व निवडक वाक्य टाकून शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. 'जनतेनं विश्वासानं तुम्हाला निवडून दिलं, त्यानंतर तुम्ही तिकडं जाता. पैशासाठी? भांडण काय तुमचं? खुर्चीसाठी?... तर शिवरायांचं नाव घेऊ नका', 'स्वाभीमान मारून टाकला आहे. तुम्ही गद्दारी केलीत. तुम्ही या लोकांच्या पाठीत वार केला, असा शाप महाराज देतील...' अशी वाक्य व्हिडिओमध्ये घेऊन फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून अभिवादन केले आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्वाचे मूर्तिमंत! अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वाहिली आहे. पण त्यासोबत शेअर केलेल्या व्हिडिओची खुप चर्चा होत आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत!#BalasahebThackeray
#बाळासाहेबठाकरे pic.twitter.com/TPVfnA6sKn— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2021
यामध्ये त्यांनी आपल्या व बाळासाहेबांच्या भाषणातील काही निवडक व सुचक वाक्य घेतली आहेत. दरम्यान, राजकारणात एखादी भूमिका घेतली तर त्याला बाळासाहेबांच्या भूमिकेला छेद दिला असे म्हणता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले.
फडणवीस म्हणतात, 'अलीकडच्या राजकारणात बघतो की नेत्यांची मने छोटी होतात. ते आपल्यापलीकडे पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेबांचे मन राजासारखं होतं. जिंको किंवा हरो, ते आले की चैतन्य निर्माण करायचे. ते येऊन गेल्याने जिंकल्याची मजा यायची. ही त्यांची ताकद होती.' यानंतर लगेच बाळासाहेबांच्या भाषणातील निवडक वाक्य जोडण्यात आली आहेत.
'स्वाभीमान मारून टाकला आहे. तुम्ही गद्दारी केलीत. तुम्ही या लोकांच्या पाठीत वार केला. असा शाप आम्हाला महाराज देतील. शासन म्हणजे काय तुमच्यासाठीच, तुम्हीच निवडूण दिलेलं. ही लोकशाही नव्हे. जनतेनं विश्वासानं तुम्हाला निवडूण दिलं. आणि तुम्ही तिकडं जाता. पैशासाठी? भांडण काय तुमचं? खुर्चीसाठी. खुर्चीसाठी भांडायचं नाही. पैशाचे जर लाचार व्हाल तर शिवरायांचं नाव घेऊ नका. हा भगवा झेंडा हाता ठेवू नका. हे गुण आपल्या रक्तात असता कामा नयेत. तुमचं तेज कायम ठेवलं पाहिजे. लोक आदरानं पाहतात, तो आदर तसाच ठेवा.' अशा निवडक वाक्यांमधून फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत.
फडणवीस यांनी आपल्या काही भाषणांमधील निवडक वाक्यही यामध्ये घेतली आहेत. बाळासाहेब हे सर्वांसाठीच स्फुर्ती देणारं, प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते. आमच्यासाठी ते नेहमीच आदरस्थानी राहतील. त्यांच्या विचारांसाठी नेहमीच उभे राहू. तुम्ही मिसळ केली असेल त्यांच्या विचारात. आम्ही केली नाही, असे ते म्हणतात. फडणवीसांचे हे ट्विट सध्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे.
Edited By Rajanand More

