Devendra Fadnavis criticizes Mumbai Municipal Corporation for giving work to PFI | Sarkarnama

राष्ट्रविरोधी कारवायांमधील आरोपी 'पीएफआय'वर मुंबई पालिकेची मर्जी : फडणवीस

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 जून 2020

राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कारवायांमध्ये आरोपी, अनेक राज्यांमध्ये ज्या संस्थेवर बंदीची कारवाई केली जात आहे, राष्ट्रीय तपास संस्थेने तपास हाती घेतलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेला मुंबई महापालिकेने वैधता प्रदान केली आहे काय, असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई : राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कारवायांमध्ये आरोपी, अनेक राज्यांमध्ये ज्या संस्थेवर बंदीची कारवाई केली जात आहे, राष्ट्रीय तपास संस्थेने तपास हाती घेतलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेला मुंबई महापालिकेने वैधता प्रदान केली आहे काय, असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई महापालिकेने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पीएफआय या संस्थेला दिली आहे. त्याबाबतचे अधिकृत परिपत्रकसुद्धा 18 मे रोजी जारी करण्यात आले आहे. हे परिपत्रक ट्‌विट करून हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

ते म्हणतात की, "ज्या संघटनेवर देशविरोधी आणि समाजविरोधी कारवायांचा ठपका आहे, त्या संस्थेला हे काम देणे ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे. केरळ, कर्नाटक, झारखंड, उत्तरप्रदेश या राज्यात या संस्थेवर बंदीची कारवाई केली जात आहे. भारतीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात जी निदर्शने अलीकडच्या काळात झाली, त्यातील दंगलींसाठी विदेशी निधी स्वीकारण्याचा आरोप या संस्थेवर आहे. ईडीनेही बॅंक खाती शोधून काढली आहेत. एनआयए या तपास संस्थेने त्याची दखल घेऊन आरोपपत्राची कारवाई प्रारंभ केली आहे.' 

अशा संस्थेला मुंबई महापालिकेने हे काम देणे, म्हणजे एकप्रकारे त्यांच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्र्यांची सहमती आहे का?, नसेल तर ज्यांनी याबाबतचा निर्णय केला, त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि हा निर्णय मागे घेणार का, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख