आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र येणे आमच्यासाठी चांगलेच..... - Devendra Fadanavis Narrates about Mahavikas Aghadi in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र येणे आमच्यासाठी चांगलेच.....

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 डिसेंबर 2020

महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र येणे ही भाजपसाठी फायद्याची बाब आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजप पक्ष प्रवेशावेळी फडणवीस प्रदेश कार्यालयात बोलत होते.

मुंबई  : महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र येणे ही भाजपसाठी फायद्याची बाब आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजप पक्ष प्रवेशावेळी फडणवीस प्रदेश कार्यालयात बोलत होते.

नाशिकचे माजी आमदार बाळसाहेब सानप यांनी आज शिवसेनेचा राजीनामा देऊन ते स्वगृही भाजपमध्ये परतले. पक्षाच्या प्रेदश कार्यालयात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, आशिष शेलार आदी उपस्थित होते. 

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमची इच्छा आहे. काही निवडणुकांमध्ये कमी-जास्त झाले म्हणजे चिंता करण्याचे कारण नाही. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्याला संधी दिली आहे. त्यामुळे जी काही पोकळी निर्माण झाली आहे ती आम्ही भरून काढू. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने एकत्र निवडणूक लढवावी. ते आमच्या पथ्यावरच पडेल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

भाजपचे आमदार आमच्याकडे येणार, अशा वावड्या महाविकास आघाडीचे नेते उठवत राहतात, पण कुणीही जाणार नाही. विरोधकांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या देशाचा वर्तमान आणि भविष्य हे नरेंद्र मोदी आहेत, हे आमच्या कार्यकर्त्यांना ठाऊक आहे. सर्व निवडणुका आम्ही जिंकत आहोत. येत्या काळात लोक आपल्याकडे येणार आहेत. त्यांनाही चांगली जबादारी आपण देणार आहोत. परिवारामध्ये छोटा वाद होतो, पण परत ते एकत्र येतात. आपल्यापासून दुरावलेले सानप पुन्हा एकदा प्रवेश करत आहेत. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. नाशिकमध्ये भाजपच्या वाटचालीत ज्यांचे परिश्रम आहे त्यात सानप आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख